पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार, गुन्हे शाखा युनिट दोन रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडीच्या गुन्ह्याचा समांतर तपास करत होती. याचदरम्यान, पोलीस हवालदार विक्रम कुदळ यांना माहिती मिळाली की, संशयित चोरटे चोरीच्या कारमधून सोमाटणे फाटा टोल नाक्यावर येणार आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी तातडीने सापळा रचून संशयित कार थांबवली. पोलिसांनी चोरट्यांना बाहेर येण्यास सांगितले असता, कारमध्ये मागे बसलेला आरोपी मनीष बाबूलाल कुशवाह (मूळ रा. मध्य प्रदेश) याने पोलिसांवर गोळीबार करण्याच्या उद्देशाने पिस्तूल काढले.
advertisement
Pune News: नवले पूल अपघातानंतर मोठा निर्णय, पुण्यातील ‘हा’ रस्ता कायमचा बंद!
त्याचवेळी पोलीस हवालदार भाऊसाहेब राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत आरोपीच्या दिशेने झेप घेतली. या झटापटीदरम्यान झालेल्या गोळीबारात गोळी कारच्या छतामधून (टपामधून) आरपार गेली. ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. हवालदार राठोड यांनी लगेचच कुशवाह याच्या हातातील पिस्तूल हिसकावून घेतले. पोलिसांनी तत्काळ कुशवाह याच्यासह कारमधील अन्य दोन सराईत आरोपी सनीसिंग पापासिंग दुधानी आणि जलसिंग राजपूतसिंग दुधानी (दोघेही रा. हडपसर, पुणे) यांना जेरबंद केलं. तिन्ही आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
