पुण्यातील औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे या भागाला पावसाने झोडपले. पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यासह पिंपरी चिंचवड आणि राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. बाणेर येथे गारांचा जोरदार पाऊस सध्या सुरू आहे. अचानक पाऊस पडल्यामुळे पुणेकरांची धांदल उडाली.
गारांच्या पावसाने झोडपले
तळपत्या उन्हाच्या झळांनी हैराण झालेल्या पुणेकरांना निसर्गाने आज एक मोठा धक्का दिला. सकाळपासून असलेल्या प्रचंड उकाड्यानंतर दुपारी अचानक आभाळ भरून आले आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरींनी पुणेकरांना झोडपून काढले. विशेष म्हणजे, काही भागांत गारांचा पाऊस पडल्याने उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव आला, मात्र या अवकाळी पावसामुळे पुणेकरांची मोठी तारांबळ उडाली आहे.
advertisement
गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 40 अंशांच्या आसपास असताना, आज दुपारी अचानक वातावरणात बदल झाला आणि अवकाळी पावसाने हजेरी लावली. जेमतेम अर्धा तास झालेल्या या जोरदार पावसाने संपूर्ण पुण्याला अक्षरशः झोडपून काढले. बाणेर आणि बालेवाडी परिसरात तर गारांचा पाऊस झाल्याने रस्त्यांवर पांढरेशुभ्र सडे पाहायला मिळाले.
ऐनवेळी पडलेल्या पावसामुळे पुणेकरांची उडाली धांदल
सकाळपासूनच शहरात प्रचंड उकाडा जाणवत होता. नागरिक घामाघूम झाले असतानाच दुपारी 3 वाजेच्या सुमारास पश्चिम पुण्यातील आकाशात ढगांची दाटी झाली. औंध, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे आणि पाषाण या भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे दुचाकीस्वारांची मोठी धावपळ उडाली. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
पिंपरी-चिंचवडमध्येही हजेरी
पुणे शहरासोबतच पिंपरी-चिंचवड आणि लगतच्या ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. हवामान खात्याने आधीच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा दिला होता . गारांच्या पावसामुळे वातावरणात काही काळ थंडावा निर्माण झाला असला, तरी आर्द्रता वाढल्यामुळे सायंकाळी पुन्हा उकाडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेतकऱ्यांची चिंता वाढली
उन्हाळी पिके आणि फळबागांसाठी हा अवकाळी पाऊस घातक मानला जात आहे. विशेषतः आंब्याचा हंगाम ऐन जोमात असताना गारा पडल्याने फळांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे
