पुण्यातील 16 विकास प्रकल्पांवर चर्चा
शासकीय विश्रामगृह याठिकाणी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये पुण्यातील 16 विकास प्रकल्पांवर चर्चा झाली. वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गांचे काम लवकरच सुरू होणार आहे. पीएमआरडीएच्या माध्यमातून सुरू झालेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे काम सध्या 94% पूर्ण झाले असून, 23 पैकी 13 स्टेशन एप्रिल अखेर तयार होतील. येरवडा कारागृह ते विमानतळ आणि कल्याणीनगर ते विमानतळ रस्त्यांचे विस्तारीकरण व सौंदर्यीकरण लवकरच सुरू होईल. त्यासाठी भूसंपादनही सुरू केले जाणार आहे.
advertisement
महिला दिनाला करा फिरायचा प्लॅन; पीएमपी सोडणार विशेष पर्यटन ई-बस, इथे करा बुकिंग
विमानतळ, नदी व पाणीपुरवठा प्रकल्पांवर गती
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण आणि पर्यायी रस्ता तयार करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. याशिवाय राष्ट्रीय नदीसंवर्धन प्रकल्पांतर्गत नदीसुधार आणि नदी पुनरुज्जीवन कामांचे वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रशासनाला त्वरित सूचनाही देण्यात आल्या आहेत. समान पाणीपुरवठा योजनेत उर्वरित साठवणूक टाक्या, जलवाहिन्या व मीटर बसवण्याचे काम लगेच पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील प्रदूषण वाढल्यामुळे योग्य उपाययोजना तातडीने करण्यास सांगितले, तसेच पदपथ अतिक्रमण मुक्त करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
स्मारकांच्या कामांना गती
एनडीए (चांदणी) चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्मारक, डेक्कन जिमखाना येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक, बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास, कोथरूड येथील बाळासाहेब ठाकरे कलामंदिर, गदिमा स्मारक, लहुजी वस्ताद साळवे स्मारक आदी कामांचा आढावा घेऊन सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.






