सीसीटीव्हीमुळे खुलासा
हडपसर आणि काळेपडळ परिसरात वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांमुळे पोलीस सतर्क होते. तपास पथकातील पोलीस अंमलदार महादेव शिंदे, लक्ष्मण काळे आणि त्यांच्या पथकाने परिसरातील तब्बल १०२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. यादरम्यान, उंड्री येथील पोखराई धरण परिसरात एक चोरीची रिक्षा झाडाखाली उभी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शादाब युसूफ अन्सारी (वय २५, रा. सय्यदनगर) याला शिताफीने ताब्यात घेतले.
advertisement
असा उघड झाला गुन्हा
आरोपी शादाब हा अत्यंत हुशारीने चोरीच्या रिक्षांचे रूप पालटत असे. तो शहरातून रिक्षा चोरायचा आणि त्यानंतर त्या रिक्षाला मोडीत निघालेल्या (स्क्रॅप) रिक्षांचे बनावट नंबर लावून वापरायचा. जेणेकरून पोलिसांना संशय येऊ नये. मात्र, काळेपडळ पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामुळे त्याचा हा बनाव उघड झाला. त्याच्याकडून हस्तगत केलेल्या ६ रिक्षांपैकी ५ रिक्षांच्या चोरीबाबत काळेपडळसह इतर पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने यशस्वी केली आहे. या कारवाईमुळे हडपसर परिसरातील रिक्षा चोरीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.
