वादाचं कारण काय?
तक्रारदार महिला वकील गेल्या दीड वर्षांपासून मोटर वाहन न्यायालयात प्रॅक्टिस करत आहेत. त्यांना आरोपी वकिलाच्या तुलनेत जास्त प्रकरणे (केसेस) मिळत असल्याच्या कारणावरून त्यांच्यात आधीपासूनच धुसफूस सुरू होती. याच वैमनस्यातून २४ फेब्रुवारी रोजी सकाळी न्यायालयात वाद झाला.
advertisement
दुपारच्या सुमारास फिर्यादी वकील न्यायालयाच्या बाहेर पडत असताना आरोपी महिलेने त्यांना गाठलं आणि शिवीगाळ करत तोंडावर ठोसा मारला. त्यानंतर दोघींमध्ये जोरदार झटापट सुरू झाली. याच दरम्यान आरोपी वकिलानं हातातील एका अणकुचीदार वस्तूनं फिर्यादीच्या डोक्यावर प्रहार केला. जखम खोल असल्याने मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आणि जखमी वकील महिलेला चक्कर आली.
हा थरार पाहून उपस्थित वकिलांनी धाव घेत जखमी महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मारहाण आणि फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
