पर्यटनाचा आनंद ठरला शेवटचा
मृत तरुणाचे नाव सोमनाथ राजेंद्र भोसले (वय 24) असे असून तो मूळचा शिर्डी येथील रहिवासी होता. सध्या तो पुण्याच्या हडपसर परिसरात वास्तव्यास होता. सोमनाथ मित्रांसोबत पर्यटनासाठी काशीद समुद्रकिनारी आला होता. रविवारी दुपारी मित्रांसमवेत तो समुद्रात पोहण्यासाठी गेला.
पाण्याचा अंदाज न आल्याने ओढवला अनर्थ
मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने सोमनाथ खोल पाण्यात ओढला गेला. समुद्राच्या लाटांचा जोर अधिक असल्याने तो स्वतःला वाचवू शकला नाही. त्याच्या मदतीसाठी मित्रांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत सोमनाथ पाण्यात बुडाला होता.
advertisement
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सोमनाथला तातडीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.या घटनेनंतर सोमनाथच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक खबरदारी घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
