विवाह थांबला, पण माणुसकीने दिलं नवजीवन
कवडे आणि गलांडे कुटुंबीयांनी आपल्या प्रिय मुला-मुलीच्या विवाहासाठी वानवडी परिसरातील खुल्या लॉनमध्ये सर्व तयारी उरकली होती. सजावट, रोषणाई, पाहुण्यांची रेलचेल, आणि शुभमुहूर्तासाठी सज्ज झालेला विवाहमंच. सगळं काही नियोजनात होतं. पण अचानक आकाश फाटलं आणि जोरदार पावसानं सगळं लॉन जलमय केलं. त्यामुळे लग्न थांबवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. आस्मानी संकटामुळं वडिलांच्या डोळ्यांतून हताश अश्रू वाहू लागले.
advertisement
FYJC Admission: ठरलं तर..! या दिवशी पुन्हा सुरू होणार अकरावीची प्रवेश प्रक्रिया, वेळापत्रक जाहीर
‘अलंकार लॉन’मधून उठले माणुसकीचे सूर
हिंदू कुटुंबावर आलेलं संकट पाहून एक मुस्लिम कुटुंब मदतीसाठी सरसावलं. शेजारील ‘अलंकार लॉन’मध्ये मुस्लिम नवविवाहित जोडप्याचा वलीमा समारंभ सुरू होता. फारूक काझी यांनी परिस्थिती पाहिली आणि कोणतीही अट न ठेवता आपला रिसेप्शन हॉल दीड तासासाठी खुला करून दिला. त्यामुळे नरेंद्र आणि संस्कृतीचा विवाह त्या हॉलमध्ये विधीपूर्वक पार पडला. मंगलाष्टकांच्या गजरात, आणि हिंदू-मुस्लिम पाहुण्यांच्या उपस्थितीत एक आदर्श विवाह संपन्न झाला.
वडील म्हणून वडिलांना साथ
विवाहानंतर काझी कुटुंबाने पुन्हा आपला वलीमा समारंभ सुरू केला. त्यांच्या या उदारतेने कवडे आणि गलांडे कुटुंबीयांचे अश्रूही आनंदात परावर्तित झाले. "माझ्या मुलाच्या लग्नाचं स्वप्न पूर्ण झालं, कारण शेजारी माणूस म्हणून मदतीसाठी उभं राहिला," असं भावूक उद्गार वडिलांनी काढले.
धर्म नाही, माणुसकीच मोठी!
समाजात काही वेळा जातीय आणि धार्मिक संघर्ष निर्माण केले जातात. परंतु, या सगळ्यांच्या पलिकडे माणुसकीचा धर्म मोठा असल्याचे या प्रसंगाने सिद्ध झाले. एक वडील आपल्या पोटच्या गोळ्याचं स्वप्न पूर्ण करू शकले, कारण दुसऱ्या वडिलांनी आपला आनंद थांबवून त्यांना आधार दिला. त्यामुळे या विवाहाचं सध्या संपूर्ण परिसरात कौतुक होत आहे आणि माणुसकीच्या विजयाने पुणे शहर पुन्हा एकदा प्रकाशमान झालं आहे.