नेमकी घटना काय?
अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथील मुन्ना राजू शिंदे (वय २१) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी अवध कलीम बिनसाद, ज्ञानेश्वर महादेव धायतडक आणि अमोल आवटे यांनी तरुणांना नोकरीचे आमिष दाखवले होते. रांजणगाव एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये 'एमएसएफ फोर्स एजन्सी'च्या माध्यमातून सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी लावून देतो, असे आश्वासन त्यांनी दिले होते.
advertisement
आरोपींनी ३७ तरुण आणि १० तरुणींना १६ हजार रुपये पगार आणि दिवसाचे फक्त ८ तास काम असेल, असे स्वप्न दाखवले. नोकरी पक्की करण्यासाठी आणि गणवेश तसंच किटसाठी प्रत्येकाकडून पैसे गोळा करण्यात आले. फिर्यादी आणि त्यांच्या मित्रांकडून अशा प्रकारे एकूण ७० हजार रुपये उकळण्यात आले. मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याचे आणि फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणांनी पोलिसांत धाव घेतली.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीची गंभीर दखल घेत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीने आणखी किती तरुणांना अशा प्रकारे फसविले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.
