येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी माहिती दिली की, प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे येथे प्रथमच बंदी मनोरुग्ण अनोळखी शिवम हा 27 ऑक्टोबर 2021 रोजी शिवूर (ता. वैजापूर, जि. संभाजीनगर) पोलीस स्टेशनमार्फत मानसिक आजारावर उपचारासाठी प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झाला होता. त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 295 अंतर्गत धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद होता. मात्र त्याची ओळख, मूळगाव किंवा नातेवाईकांची कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. मनोरुग्णालयात अनोळखी बंदी रुग्ण म्हणूनच त्याची नोंद होती.
advertisement
ठाणे-नाशिक-वसईकरांसाठी महत्त्वाची बातमी, घराबाहेर पडण्याआधी ही बातमी वाचाच
उपचारादरम्यान रोहिणी भोसले यांनी त्याच्याशी संवाद साधताना तो पहाडी हिंदी भाषिक असल्याचे ओळखले. शिक्षणाविषयी विचारल्यावर त्याने तुटक माहिती देत प्रेम विद्यालय, रुरकी, हरिद्वार इतकेच सांगितले. या धाग्यावरून भोसले यांनी गुगल सर्च करून गावाचा शोध घेतला आणि स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला. काही दिवसांतच शिवमच्या कुटुंबीयांचा शोध लागला. व्हिडिओ कॉलवर झालेल्या संवादात त्याच्या भावांनी शिवमला पाहताच अश्रू अनावर झाले. कारण 2015 च्या केदारनाथ पूरात वाहून गेल्यानंतर त्यांनी त्याचा प्रतिकात्मक अंत्यसंस्कारही केला होता.
नातेवाईक सापडल्यानंतरही अडथळे संपले नाहीत. गुन्हा नोंद असल्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करूनच सुटका शक्य होती. तपासादरम्यान समोर आले की शिवम निर्दोष आहे. प्रत्यक्षात गुन्ह्यातील इतर आरोपींनी स्वतःची सुटका व्हावी म्हणून शिवमचे नाव मुद्दाम घेतले होते. नव्याने नियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांनी चार्जशीट तयार केली आणि प्रकरण पुढे ढकलले.
पण न्यायालयीन प्रक्रिया संथ होती. तरीही रोहिणी भोसले यांनी वैजापूर न्यायालय, पोलीस विभाग, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि मानसिक आढावा मंडळ अशा सर्व यंत्रणांशी सातत्याने पत्रव्यवहार केला. दरम्यान, मनोरुग्णालयातील क्रिमिनल वॉर्डचे निलेश दिघे, परिचारिका तसेच वैद्यकीय अधिकारी यांची टीम शिवमला सातत्याने मानसिक आधार देत राहिली.
दोन वर्षांच्या प्रयत्नांनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या आदेशानुसार प्रकरणाला गती मिळाली आणि अखेर वैजापूर न्यायालयाने शिवम निर्दोष घोषित करत सुटकेचे आदेश दिले. त्यानंतर सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून रुग्णालय प्रशासनाने शिवमला त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले.
शिवम आणि त्याच्या भावंडांची झालेली पुनर्भेट पाहताना रुग्णालयातील कर्मचारीही गहिवरले. दोन वर्षांच्या संवेदनशील आणि अविरत प्रयत्नांमुळे एका कुटुंबाचा हरवलेला सदस्य पुन्हा त्यांच्यात परतला. ह्या गेल्या दोन वर्षाच्या प्रवासामध्ये रोहिणी भोसले यांना डॉ. शमा राठोड, डॉ. वर्षा बेडगकर, डॉ. इंगळे, डॉ. अमित गोसावी आणि वॉर्डचे कविता गाडे सिस्टर आणि रुग्णालयाच्या टीमने खूप सहकार्य केले असल्याची माहिती यावेळी मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोलोड यांनी सांगितले.
ही घटना प्रशासनातील मानवतावादी दृष्टिकोनाचे अनोखे उदाहरण ठरते. प्रादेशिक मनोरुग्णालय, पुणे यांनी प्रथमच बंदी मनोरुग्णाचे कौटुंबिक पुनर्वसन करून इतिहास घडवला आहे.





