टोल प्लाझावर वाहनांच्या वेगावर मोठी मर्यादा
नवले पूल परिसरातील भीषण अपघातानंतर वाहनांची वेगमर्यादा 60 किलोमीटर प्रतितासावरून थेट 30 किलोमीटर प्रतितास करण्यात आली असून, स्पीडगनद्वारे सतत वेगनियंत्रणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. मात्र, वेगमर्यादा अचानक निम्म्यावर आणण्याचा निर्णय वैज्ञानिक अभ्यासावर आधारित आहे का, याबाबत अद्याप स्पष्टता मिळालेली नाही. या उतारावर वेग हळूहळू कमी करण्यासाठी पुरेसे संकेत फलक लावण्यात येणार की नाही, याचाही उलगडा बाकी आहे.
advertisement
शनिवारी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी नवले पूल परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना रस्ते सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आणि जड वाहनांची काटेकोर तपासणी करणे अत्यावश्यक झाले आहे, असे मोहोळ म्हणाले.
यादरम्यान खेड शिवापूर टोलनाक्यावर अवजड मालवाहतूक वाहनांची तपासणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेल्या वाहनांना टोलनाक्यावरच थांबवून अतिरिक्त माल उतरविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच, जड वाहनांची तांत्रिक तपासणी आणि ब्रेक चाचणीही केली जाणार आहे. मात्र, ही तपासणी सुरू झाल्यानंतर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावर पर्यायी योजना म्हणून वर्तुळाकर मार्ग, तसेच जांभूळवाडी–वारजे मार्गावरील वाहतूक वळविण्याची तयारीही सुरू आहे.
दरी पूल ते वडगाव बुद्रुक परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सध्या या मार्गावर तीन स्पीडगन कार्यरत आहेत. त्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तर स्वामिनारायण मंदिर ते नवले पूलदरम्यानच्या तीव्र उतारावर गतिरोधक पट्ट्यांची स्थापना करण्यात आली आहे.
नवले पूल परिसरातील वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियंत्रण, जड वाहनांवरील देखरेख आणि रस्त्याच्या रचनेत आवश्यक ते बदल या सर्वच पातळ्यांवर प्रशासन काम सुरू करत आहे. मात्र, या उपाययोजनांमुळे स्थानिक वाहतूक आणि टोलनाक्यावरील गर्दीचे नवे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता अद्याप टळलेली नाही.
