मुळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असलेला सनी फुलमाळी याचा परिवार मागील पंधरा वर्षांपासून लोहगावात एका झोपडीत वास्तव्यास आहे. वडील सुभाष फुलमाळी नंदीबैल घेऊन दारोदार भविष्य सांगतात, तर आई सुया-दाभण विकून उदरनिर्वाह करतात. अशा अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही सनीने आपली स्वप्ने जिवंत ठेवली आणि कुस्तीच्या माध्यमातून जीवन बदलवण्याचा निर्धार केला. सनीचा कुस्तीप्रवास आजोबांच्या काळापासून सुरू झाला. वडिलांनाही कुस्तीची आवड होती.परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी ती थांबवावी लागली. तरीही मुलांनी पैलवान व्हावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी आपल्या तीनही मुलांना भैय्या, बादल आणि सनीला कुस्ती शिकवायला सुरुवात केली.
advertisement
झोपडीजवळच्या माळरानावर तात्पुरती तालीम उभारून सुभाष फुलमाळी मुलांना सराव करून घ्यायचे. परिस्थितीशी झुंज देत त्यांनी स्वतःचा नंदीबैल विकून मुलांना तालमीत पाठवलं. सनीचा खेळ आणि चिकाटी पाहून लोहगावमधील रायबा तालीमचे वस्ताद पै. सोमनाथ मोझे आणि सदाशिव राखपसरे यांनी त्याला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्याची खेळाडू वृत्ती ओळखून त्याला पुढे लोणीकंद येथील जाणता राजा तालीममध्ये वस्ताद संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आलं. सनीची परिस्थिती पाहून वस्ताद भोंडवे यांनी त्याचा संपूर्ण खर्च उचलला आणि त्याला आपल्या तालीमखाली तयार केलं.
सनी सांगतो, घरची परिस्थिती खूप अवघड होती. वस्ताद संदीप भोंडवे यांनी मला दत्तक घेतलं आणि माझा सर्व खर्च केला. त्यांच्या प्रेरणेने आणि मार्गदर्शनाने मी इथपर्यंत पोहोचलो.सनी सध्या दहावीत शिक्षण घेत आहे. महाराष्ट्र चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर त्याला नॅशनल स्पर्धेत रौप्यपदक मिळाले होते. त्यानंतर बहरीनमध्ये झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत त्याने इराक, इराण, जपान, कोरिया यांसारख्या देशांच्या खेळाडूंवर मात करून सुवर्णपदक पटकावले.
सनीचा हा झोपडीतून सुवर्णपदकापर्यंतचा प्रवास केवळ प्रेरणादायी नाही, तर हजारो तरुणांसाठी आशेचा किरण आहे. लोहगावमधील रायबा तालीम आणि जाणता राजा तालीमच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या या गोल्डन बॉय ने दाखवून दिले आहे की जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतीही स्वप्ने साकार होऊ शकतात. सनी आता ऑलिंपिकसाठी तयारी करत असून, देशासाठी सुवर्णपदक आणणे हेच माझं पुढचं ध्येय आहे,असं तो म्हणतो. स्थानिक नागरिक आणि प्रशिक्षकांनी शासनाकडे सनीसाठी विशेष आर्थिक मदत व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.