पुणे : गोकुळाष्टमीनिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. ठिकठिकाणी दहीहंडीचे थर पाहायला मिळतील. यामुळे कुठंही वाहतूक कोंडी होऊ नये, प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
पुण्यातील वर्दळीच्या रस्त्यांवरच काही हंड्या उभारल्या जातात. या हंड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यंदा ही समस्या होऊ नये म्हणून मंगळवारी (27 ऑगस्ट) संध्याकाळी 5 वाजल्यापासून दहीहंडी फुटेपर्यंत काही भागांमधील वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. गर्दी वाढल्यानंतर छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता वाहतूकीस बंद ठेवण्यात येईल. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गानं वळविण्यात येणार आहे, असं वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी सांगितलं.
advertisement
प्रवाशांनी शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटला जाण्यासाठी स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्यानं खंडोजी बाबा चौक, टिळक चौक - पुढे टिळक रस्ता, शास्त्री रस्त्यानं इच्छित स्थळी जावं. पुरम चौकातून बाजीराव रस्त्यावरून शिवाजीनगरकडे जाण्यासाठी पुरम चौकातून टिळक रस्त्यानं टिळक चौक आणि पुढे गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यानं (फग्युर्सन) इच्छित स्थळी जावं. तसंच पुरम चौकातून सेनादत्त चौकाकडे आणि पुढे इच्छित स्थळी जाता येईल.
स. गो. बर्वे चौकातून पुणे मनपा भवनकडे जाण्यासाठी : स. गो. बर्वे चौकातून जंगली महाराज रस्त्यानं - झाशी राणी चौक डावीकडे वळून इच्छित स्थळी जावं. बुधवार चौकाकडून अप्पा बळवंत चौकाकडे एकेरी वाहतूक सुरू राहील. अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे येणारी वाहतूक बाजीराव रस्त्यानं सरळ सोडली जाईल. रामेश्वर चौक ते शनिपार चौकाकडे येणारी वाहतूक बंद असेल. सोन्या मारुती चौकाकडून लक्ष्मी रस्त्यानं सरळ सेवासदन चौकाकडे वाहतूक बंद करण्यात आली आहे. वाहनं सोन्या मारुती चौकातून उजवीकडे वळून फडके हौद चौकातून इच्छित स्थळी जातील.
शिवाजी रस्त्यानं जिजामाता चौकातून गणेश रस्त्यानं दारुवाला पुलाकडे जाणारी वाहतूक ही गाडगीळ पुतळा इथून डाव्या बाजूनं कुंभारवेस चौक-पवळे चौक-जुनी साततोटी पोलीस चौकीमार्गे इच्छित स्थळी जाईल. गणेश रस्त्यावरील संपूर्ण वाहतूक ही दारुवाला पूल इथून बंद राहील. तसंच देवजीबाबा चौक आणि फडके हौद चौकात वाहतूक बंद करण्यात येईल. वाहनचालकांनी अपोलो टॉकिज, नरपतगिरी चौक, दारुवाला पूल, दूधभट्टी या मार्गाचा वापर करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.