काय आहे नेमके प्रकरण?
उत्तर प्रदेसमधील श्रावस्ती येथील लक्ष्मणपूर गंगापूरची रहिवासी असलेल्या दीपाचा विवाह ओरीपुरवा येथील हंसराज याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी दीपा बेपत्ता झाली. ऑगस्ट २०२५ पासून तिचा कोणताही पत्ता लागत नव्हता. बराच शोध घेऊनही ती न सापडल्याने, दीपाच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांनी हुंड्यासाठी तिची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा खळबळजनक आरोप केला.
advertisement
न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल: सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. मात्र दीपाच्या आई-वडिलांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर दीपाचा पती हंसराज, सासरा परमेश्वर आणि सासू यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला. या गंभीर प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला.
पुण्यातील लोकेशनने फिरवली तपासाची चक्रे: तपास अधिकारी सतीश शर्मा यांनी दीपाच्या मोबाईल क्रमांकाचा तांत्रिक डेटा तपासला असता, तिचे लोकेशन महाराष्ट्रातील पुणे शहरात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुण्यात धाड टाकून दीपाला ताब्यात घेतले.
दीपाने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक खुलासा केला. तिने सांगितले की, कोणाच्याही दबावाखाली न येता ती स्वतःच्या मर्जीने घर सोडून पुण्यात आली होती आणि तिथेच राहत होती. आता पोलिसांनी दीपाला ताब्यात घेऊन श्रावस्तीत नेले असून तिला न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिच्या जबाबानंतर सासरच्या मंडळींवर लावण्यात आलेले हत्येचे कलम काढले जाणार की त्यांना इतर काही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागणार, हे स्पष्ट होईल. मात्र, एका जिवंत व्यक्तीच्या हत्येचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा होत आहे.
