शिवसेनेचे नेते वसंत मोरे आज गुरुवारी दुपारी आपल्या कार्यकर्त्यांसह नवले पुलावर काय उपाय योजना करता येतील, हे पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर लाईव्ह केलं होतं. वसंत मोरे यांनी नवले पुलावर उपाय योजना करण्यासाठी वेग मर्यादा पाळली पाहिजे, ६० किमीची मर्यादा आहे, त्या ऐवजी ३० किमी करावी, असं सांगत होते.
advertisement
नवले पुलाच्या महामार्गाच्या बाजूला उभं राहुन वसंत मोरे बोलत होते. पण अचानक त्याचवेळी एक भरधाव टेम्पो वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बाजूने गेला. भरधाव टेम्पो समोरून येताना पाहून वसंत मोरे जोरात किंचाळले, ये नितीन.., असं म्हणत नाही तेच भरधाव टेम्पो वसंत मोरे यांच्या बाजूने उभ्या असलेल्या कार्यकर्तांच्या अंगाजवळून गेला.
टेम्पोचा वेग इतका होता की, मागे वळून पाहण्यापर्यंत दूरपर्यंत गेला होता. 'कसला गेला जोरात', असं कार्यकर्ते म्हणतच राहिले अन् टेम्पो पुढे एका रिक्षाला ओव्हरटेक करून फरार झाला. हा सगळा प्रकार फेसबुक लाईव्हमध्ये कैद झाला. सुदैवाने वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना काहीही झालं नाही. पण, जो काही प्रकार घडला तो अंगावर शहारे आणणारा होता. या घटनेनंतर वसंत मोरे यांनी पुढे ७ मिनिटांचं फेसबुक लाईव्ह केलं आणि आटोपतं घेतलं.
