हॉटेलचालक संकटात, खाद्यपदार्थांची संख्या घटली
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याने हॉटेलचालकांनी आधीच मेन्यू कार्डमधील पदार्थांची संख्या कमी करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः डोसा, उत्तपा यांसारखे जास्त गॅस लागणारे पदार्थ हॉटेलमधून गायब होऊ लागले आहेत. "साठा संपला की हॉटेल बंद करण्याशिवाय पर्याय नाही," अशी स्पष्टोक्ती पुणे रेस्टॉरंट अँड केटरिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किशोर सरपोतदार यांनी दिली आहे. काही ठिकाणी इंडक्शन शेगड्यांचा वापर केला जात असला, तरी त्यांच्या तुटवड्यामुळे आणि वाढलेल्या किमतींमुळे हॉटेल व्यावसायिकांची कोंडी झाली आहे.
advertisement
गॅसचा काळाबाजार तेजीत
दुर्दैवाची बाब म्हणजे, या टंचाईचा फायदा घेत गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू झाला आहे. काळ्या बाजारात सिलिंडर दुप्पट किमतीला विकले जात असून, हॉटेलचालक नाइलाजास्तव ही मोठी किंमत मोजत आहेत. मात्र, ही धडपड फार काळ टिकणारी नाही. जर युद्धजन्य स्थिती सुधारली नाही आणि पुरवठा सुरळीत झाला नाही, तर अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि खानावळी बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हे असंच सुरू राहिल्यास येत्या काही दिवसांत शहरातील बहुतांश खानावळी आणि रेस्टॉरंट्स बंद पडतील.
