मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या आपल्या आईला भेटण्यासाठी निघाली होती. भिगवण येथून एका पिकअप गाडीने ती कुरकुंभपर्यंत पोहोचली. तिथून पुढे पुण्याला जाण्यासाठी ती भराव पुलाजवळ वाहनाची वाट पाहत उभी होती. यावेळी आरोपी अमोल काळे हा आपल्या (MH 42 BN 7755) क्रमांकाच्या वाहनातून तिथे आला. "मी पण पुण्यालाच चाललो आहे, तुम्हाला सोडतो," असे सांगून त्याने महिलेचा विश्वास संपादन केला आणि तिला गाडीत बसवले. मात्र, पुढे जे घडणार होते, त्याची या महिलेला कल्पनाही नव्हती.
advertisement
बंदुकीचा धाक आणि अत्याचार
गाडी काही अंतर पुढे गेल्यानंतर आरोपीने आपले खरे रूप दाखवले. त्याने गाडी निर्जन ठिकाणी नेली आणि महिलेला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केला. इतकेच नाही तर, या घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली. पीडितेने या धक्क्यातून सावरत दौंड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासचक्र फिरवले आणि आरोपीला अटक केली. महामार्गावर एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
