पुणे : पुण्यातून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. बेटिंगमध्ये पैसे हरल्यामुळे एका उच्चशिक्षित तरुणाने पुण्यातल्या नामांकित विद्यापीठाला 2.50 कोटी रुपयाला गंडा घातला आहे. विशेष म्हणजे, या भामट्याने लंडन मधून PHD घेतल्याचं सांगत होता. पुणे पोलिसांच्या सायबर ब्रांचने हैदराबाद इथं सापळा रचून तरुणाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोथरुड परिसरातील एका नामांकित खासगी विद्यापीठाची अडीच कोटी रुपयांना फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सितैया किलारु (वय ३४) असं आरोपीचं नाव असून तो हैदराबाद इथं राहणार आहे. विशेष म्हणजे, हा आरोपी उच्चशिक्षित आहे. एवढंच नाहीतर परदेशातून पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीचे शिक्षण घेतलेलं आहे. इतकेच नाहीतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही तो दोन वेळा मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे.
advertisement
अडीच कोटींना कसा गंडा घातला?
IIT मुंबई या शिक्षण संस्थेकडून AI संबंधित शैक्षणिक प्रकल्प देण्याच्या बहाण्याने या आरोपीने ही फसवणूक केली आहे. सरकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता AI आणि ‘ड्रोन’ विषयक प्रकल्पाचा करार करण्याचं आश्वासन देऊन वारंवार दूरध्वनी आणि ईमेलद्वारे संपर्क साधला. संबंधित प्रकल्पासाठी आरोपीने खासगी विद्यापीठाकडून टप्प्याटप्याने एकूण दोन कोटी 46 लाख रुपये घेतले. मात्र, आरोपी करारासाठी न आल्याने आपली फसवणूक झाल्याचं विद्यापीठाच्या लक्षात आलं, त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
सितैया किलारु याने ‘आयआयटी’ मुंबईतील प्राध्यापक असल्याचं भासवत 2.5 कोटी रुपयांना गंडवलं आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पुणे पोलिसांच्या सायबर टीमने तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचला. त्यानंतर हैदरााबादमध्ये जाऊन आरोपीला अटक केली.
10 बँकांचे ATM कार्ड, 2 गाड्या जप्त
आरोपीकडून पोलिसांनी 49 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यात दहा बँकांचे एटीएम कार्ड, तेरा पासबुक, पंधरा चेकबुक, सिमकार्ड, कॉम्प्युटर, मोबाईल, टॅब, दागिने, सोनं खरेदीच्या पावत्या. तसेच 48 लाख रुपये किमतीच्या दोन कार असा मुद्देमालाचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे, सितैयावर याआधी देखील फसवणुकीचे 8 ते 10 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.