नाशिक: अक्षय तृतीया हा सण हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. यंदा 30 एप्रिलला देशभरात अक्षय तृतीया साजरी केली जात आहे. या दिवशी आवर्जून शुभ कार्ये आणि खरेदी केली जाते. या दिवशी खरेदी केलेली संपत्ती, केलेलं दान हे ‘अक्षय’ मानलं जातं. याबाबत नाशिकमधील ज्योतिषी अमोघ पाडळीकर यांनी दिलीये.
advertisement
संपूर्ण दिवस शुभ
अक्षय तृतीया हा दिवस अक्षय (कधीही नष्ट न होणारा) म्हणून ओळखला जातो. या दिवशी केलेल्या कार्यांचे सकारात्मक परिणाम कायम राहतात. ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून अक्षय तृतीया हा कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसलेला शुभ दिवस मानला जातो. यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे, लग्न, घर खरेदी किंवा सोन्यासारख्या मौल्यवान गोष्टी खरेदी करणे या दिवशी विशेष शुभ मानले जाते.
तारीख आणि शुभ मुहूर्त
यंदा अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025, बुधवार रोजी साजरी होईल. वैशाख शुक्ल तृतीया तिथी 29 एप्रिल मंगळवार रोजी संध्याकाळी 5:32 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल रोजी दुपारी 2:13 वाजता संपेल. तिथीनुसार अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाईल.
अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य किंवा खरेदी कोणत्याही वेळी करता येते. विशेषतः सोने, चांदी, संपत्ती, वाहन किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी सकाळी 5:30 वाजल्यापासून दुपारी 12:30 वाजेपर्यंत पूजा आणि खरेदीसाठी विशेष शुभ मुहूर्त आहे, असे पंचांगात नमूद आहे. या वेळेत माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा केल्यास घरात समृद्धी आणि सुखाची प्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे.
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त
30 एप्रिल 2025 रोजी सकाळी 5:41 ते दुपारी 2:12 पर्यंत. या दिवशी सुमारे 8 तास 30 मिनिटे सोने खरेदीसाठी खूप फायदेशीर वेळ आहे. तसेच लग्न कार्यासाठी देखील शुभ वार्तालाप करण्यासाठी हा दिवस अत्यंत लाभदायी ठरते. या दिवशी कुठलेही शुभ कार्य हाती घेतल्याने ते पूर्ण होते आणि दीर्घकाळ टिकते, असे अमोघ पाडळीकर यांनी सांगितले.