पुणे : पाचशे वर्षाचा संघर्ष संपून आता राम मंदिर होत आहे. 22 जानेवारीला अयोध्येत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होत आहे. त्यामुळे सगळीकडे राम नामाचा जयघोष सुरु आहे. बाबरी मशीद पाडण्यासाठी कारसेवकांनी दिलेल्या लढ्याचं हे यश असल्याची अनेकांची भावना आहे. कारसेवेसाठी देशभरातून कारसेवक अयोध्येला गेले होते. यात पुण्यातील नवविवाहीत जोडपं राघव आणि मैथिली अष्टेकर हेही होते. याच अष्टेकर दाम्पत्यानं आपला कारसेवेचा अनुभव सांगितला आहे.
advertisement
कंपाउंड काडीसारखं तोडलं
"पहिल्या वेळेस गेले तेव्हा खूप वाईट परिस्थिती होती. अनेक लोकांचं रक्त सांडल गेलं होतं. सगळी नदी जणू काही रक्ताने वाहत होती. इतका अन्याय झाला परंतु प्रत्येकाच्या मनात होतं की आम्ही हे जिंकणार आहोत. सर्व महिला जेव्हा एकत्र गेलो तेव्हा हा लढा पाहिला. लोक जेव्हा तिथे उभी होती तेव्हा त्यांच्या मनात होतं की मशीद आम्हाला पाडायची आहे. ती काढून टाकायची अशी प्रेरणा मनात निर्माण झाल्यानंतर काय घडतंय हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. ते कपाउंड अतिशय दणकट असून ते काडीचं कंपाउंड असल्यासारखं तोडलं गेलं. आता तिथे राम मंदिर होत आहे. हा सर्व लढा आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिला. त्याचं शब्दात वर्णन करता येत नाही," असं कारसेविका मैथिली अष्टेकर यांनी सांगितलं.
बाबरी पाडली अन् पोलादी पार घेऊनच आले घरी, कोण आहेत धाराशिवमधील कारसेवक?
4 दिवस अन् 5 रात्री
या कारसेवेबाबत राघव अष्टेकर यांनीही आपला कारसेवेचा अनुभव सांगितला आहे. "1990 साली संपूर्ण भरतवर्षामधून हजारो कारसेवक अयोध्येकडे निघाले. कारसेवकांनी निघण्यापूर्वी सिंहगडावर जाऊन प्रतिज्ञा केली होती की आम्ही कारसेवा करू. पुण्यातील पर्वती भागातून 138 लोकांची तुकडी घेऊन गेलो होतो. वेगवेगळ्या ठिकाणी कारसेवकांना पकडून जेल मध्ये टाकण्याचे प्रकार झाले होते. ती कारसेवा जवळजवळ 250 किलोमीटर इतकी होती. 4 दिवस 5 रात्र चाललो. तेव्हा आम्ही अयोध्येमध्ये पोहचलो. रस्त्यामध्ये सर्व प्रकारचा समाज मदत करत होता. अन्न वाटत होते. कार सेवक जेव्हा निघाले तेव्हा त्यांच्या हातात फक्त शरयू नदीची मूठभर वाळू घेऊन कारसेवक गेले होते. अनेक कार्यकरते मारले गेले. संपूर्ण रस्त्यावर चिखल झाला आणि त्या ठिकाणी कार्यकर्ते जोरात 'जय श्री राम' घोषणा देत होते," अशी माहिती कारसेवक राघव अष्टेकर यांनी दिली.