कोल्हापूर : अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. सोने खरेदीस प्राधान्य, सुवासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. यंदा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे. तर दिवाळी पाडवा आणि बलिप्रतिपदा सणाचं महत्त्व कोल्हापुरातील मंदिर आणि शास्त्र अभ्यासक प्रसन्न मालेकर यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
वहीपूजन मुहूर्त
कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी दानशूर अशा बळीराजाची पूजा करण्यास सांगितली आहे. ज्याप्रमाणे चैत्र शुक्ल प्रतिपदेस शालिवाहन शकाचे नवे संवत्सर सुरु होते, त्याप्रमाणे कार्तिक शुक्ल प्रतिपदेस विक्रम संवत्सर सुरु होते. व्यापारी वर्षास सुरुवात होत असल्याने वहीपूजन, दुकानाची पूजा करून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. वहीपूजन मुहूर्त (2 नोव्हेंबर 2024 शनिवार) पहाटे 4.10 ते 6.40, सकाळी 8 ते 10.50.
Bhaubeej: ...म्हणून भाऊबीजेला बहीण करते 'ती' खास प्रार्थना, संबंध थेट यमराजांशी!
पाडव्याला पतीला ओवाळण्याची परंपरा
या दिवशी अभ्यंगस्नान करून स्त्रिया आपल्या पतीला ओवळतात. या दिवशी सोने खरेदी, सुवासणीकडून पतीस औक्षण केले जाते. दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेट वस्तू देतो. नवविवाहित दांपत्यासाठी पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. याला दिवाळसण म्हणतात. यानिमित्ताने जावयास सासरच्यांकडून निमंत्रण दिले जाते. नंतर स्वादिष्ट जेवण बनवून जावयास खाऊ घातले जाते आणि नंतर त्यास आहेर दिला जातो. तत्पूर्वी पत्नी आपल्या पतीला तेल आणि उटणे लावून मालिश करते आणि स्नान घालते आणि स्नान झाल्यावर औक्षण करते.
दिवाळीत साजरी करतात नवरात्री, 61 वर्षांची परंपरा, मुंबईतील हे ठिकाण नेमकं कोणतं
बलिप्रतिपदेची आख्यायिका
बलिप्रतिपदेची एक आख्यायिका आहे, त्यानुसार एकदा भगवान विष्णूचा अवतार असलेल्या वामनाने राजा बळीकडे 3 पावले जमिनीची मागणी केली होती. यावर त्याने ब्रह्मांड आणि पृथ्वीचे दोन पावलांमध्ये मोजमाप केलं होतं. यानंतर वामनाने जेव्हा बळीला तिसरं पाऊल कुठे ठेवायचं असं विचारलं तेव्हा बळीने त्याचं डोकं पुढं केलं. असं मानलं जातं की, बळीनं आपलं डोकं वामनाचं चरणी धरलं आणि वामनानं त्याच्या मस्तकावर पाय ठेवताच तो अधोलोकात पोहोचला होता. त्या वेळी भगवानांनी बळीवर प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला की, प्रतिपदेला तुझी पूजा केली जाईल, हा एक मोठा सण असेल. तेव्हापासून बळीची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली, असं सांगितलं जातं.
महाराष्ट्रात हा सण बळीराजाला समर्पित केला आहे. यादिवशी गोठा स्वच्छ केला जातो. मग शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. काही भागात गाय बैलांना मनोभावे ओवाळलं जातं. तर मेंढ्यांच्या कौतुकाचा सण धनगर समाजात केला जातो. आदिवासी समाज आज गाई-गुरांची आणि बकऱ्यांची पूजा करतात, असंही मालेकर यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.





