मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशच्या सीमेवर असलेलं भोकरदन तालुक्यातील पारध हे गाव पराशर ऋषी आणि हिडिंबादेवीसाठी प्रसिद्ध आहे. पोळ्यांनंतर या गावात तीन दिवस देवीचा उत्सव असतो. मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील लोक मोठ्या भक्तीभावाने देवीच्या उत्सवाला येतात.
advertisement
पौराणिक आख्यायिका महाभारताशी संबंधित आहे. पांडव अज्ञातवासात असताना लाक्षागृहातून काम्यक वनात आले. या वनात हिडिंब नावाचा राक्षस राहत होता. त्याने आपली बहीण हिडिंबा हिला पांडवांचा वध करण्यासाठी पाठवलं. परंतु भीमाचं बलदंड शरीर पाहून ती मोहित झाली. तिने सुंदर स्त्रीचे रूप धारण केलं. आपल्या भावाच्या दुष्ट कल्पनेविषयी तिने भीमाला सांगितलं.
बहिणीच्या दुष्ट हेतूविषयी शंका आल्यानंतर हिडिंब राक्षसाने भीमाशी युद्ध पुकारलं. या युद्धात भीमाने हिडिंबचा पराभव केला. कुंती आणि युधिष्ठिर यांच्या परवानगीने हिडिंबा राक्षसिणीशी भीमाने विवाह केला. त्यांना घटोत्कच नावाचा पुत्र झाला, ज्याने महाभारतातील युद्धात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अशी येथील पुरातन आख्यायिका आहे.
त्याचबरोबर या परिसराला दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं. इथे पराशर ऋषीने मोठे तप केले. त्यांचे भव्य मंदिर देखील या परिसरामध्ये आहे. देवी विविध संकटांपासून गावकऱ्यांचे संरक्षण करते अशी परिसरातील नागरिकांची श्रद्धा आहे. त्याचबरोबर आसपासच्या परिसरातील लोक देवीला ग्रामदेवता मानतात.