खरगोन : श्रावणातील सणांना सुरूवात झालीये. 9 ऑगस्टला सर्वत्र नागपंचमी साजरी होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत नागसर्प दोष असेल तर तो नष्ट करण्यासाठी नागपंचमी साजरी करून नागदेवतांची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो. शिवाय साप हा महादेवांचा सर्वात प्रिय दागिना मानला जातो, त्यामुळे श्रावणात येणाऱ्या या सणाला केली जाणारी पूजा विशेष ठरते.
भारतात नागपंचमीला सापांना दूध पाजण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. मात्र खरोखर सापांना दूध पाजणं योग्य आहे का? याबाबत लोकांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. सापाला दूध पाजणं म्हणजे त्याला त्रास देणं मानलं जातं. याबाबत एक्स्पर्ट काय सांगतात, जाणून घेऊया.
advertisement
दूध सापाचा आहार नाही!
नागपंचमीला सापांची पूजा केल्यानं, त्यांना दूध दिल्यानं नागदेवता प्रसन्न होतात, असं म्हणतात. परंतु सर्पमित्र महादेव पटेल सांगतात की, दूध हा सापांचा आहार नाही. साप उंदीर, बेडूक किंवा इतर लहान जीव खातो. दूध त्याला पचत नाही. उलट दुधामुळे सापाचं नुकसान होऊ शकतं. ज्याचं पाप आपल्या डोक्यावर चढू शकतं.
सापाला दूध पाजू नये, अर्पण करावं!
ज्योतिषी पंडित पंकज मेहता यांनी सांगितलं की, नागपंचमी सणाला धार्मिक महत्त्व आहे. पुराणांमध्ये नागदेवतेची पूजा आणि दूध अर्पण करण्याबाबत सांगण्यात आलंय. मात्र हे प्रतीकात्मक आहे. ज्याप्रकारे आपण महादेवांना दुग्धाभिषेक करतो, तसाच दुधाचा अभिषेक नागपंचमीला नागदेवतेला करणं आवश्यक आहे. या पूजेचा उद्देश नागदेवतेप्रति आदर व्यक्त करणं हा आहे. त्यामुळे नागदेवतांची रांगोळी काढून त्यांची पूजा करावी. त्यांच्या धातूच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करावा, असा सल्ला दिला जातो. मात्र खऱ्याखुऱ्या सापाजवळ जाऊ नये, ते घातक ठरू शकतं.
