गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यांमधील मुख्य फरक
जरी दोन्ही सण चतुर्थी तिथीला येत असले, तरी त्यांचे महत्त्व आणि पौराणिक संदर्भ वेगळे आहेत.
गणेश जयंती (माघी गणेशोत्सव): माघ शुद्ध चतुर्थीला गणेश जयंती साजरी केली जाते. असे मानले जाते की, या दिवशी गणपती बाप्पाचा प्रत्यक्ष जन्म झाला होता. म्हणूनच याला 'गणेश जन्मोत्सव' किंवा 'तिलकुंद चतुर्थी' असेही म्हणतात. 2026 मध्ये ही जयंती 22 जानेवारी रोजी साजरी होत आहे.
advertisement
गणेश चतुर्थी (भाद्रपद गणेशोत्सव): भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हा उत्सव साजरा होतो. पौराणिक कथेनुसार, या दिवशी गणपती बाप्पा कैलास पर्वतावरून आपल्या भक्तांना भेटण्यासाठी पृथ्वीवर येतात. हा बाप्पाच्या आगमनाचा आणि पाहुणचाराचा सोहळा मानला जातो, जो 10 दिवस चालतो.
'तिलकुंद चतुर्थी' हे नाव का पडले?
माघ महिन्यातील गणेश जयंतीला 'तिलकुंद' असे विशेष नाव आहे. 'तिल' म्हणजे तीळ आणि 'कुंद' म्हणजे कुंदाची पांढरी फुले. माघ महिन्यात थंडी असल्याने या दिवशी बाप्पाला तीळ अर्पण केले जातात आणि पांढऱ्या कुंदाच्या फुलांनी त्यांची पूजा केली जाते. या दिवशी तिळाचे दान करणे आणि तिळाचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत शुभ मानले जाते.
2026 मधील शुभ मुहूर्त
यावेळेस माघ महिन्यातील गणेश जयंती ही 22 जानेवारी 2026 ओजी साजरी केली जाणार आहे. बाप्पाची पूजा करण्यासाठी सकाळी 11:29 ते दुपारी 1:37 पर्यंत हा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जात आहे.
पूजेचे अत्यंत महत्त्वाचे नियम
गणेश जयंतीला बाप्पाची कृपा मिळवण्यासाठी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. पूजेपूर्वी तिळाच्या उटण्याने किंवा तिळमिश्रित पाण्याने स्नान करावे. पूजेसाठी बसताना पिवळे किंवा लाल वस्त्र परिधान करणे उत्तम मानले जाते. भाद्रपद चतुर्थीप्रमाणेच माघी गणेश जयंतीलाही चंद्र दर्शन घेऊ नये. या दिवशी चंद्र पाहिल्यास 'कलंक' लागतो किंवा खोटा आळ येतो, अशी धार्मिक मान्यता आहे. गणपतीला 21 दुर्वांची जोडी आणि लाल रंगाचे जास्वंद किंवा कुंदाची फुले अर्पण करावीत. यामुळे बाप्पा लवकर प्रसन्न होतात. या दिवशी बाप्पाला तिळाचे मोदक किंवा तिळाच्या लाडूंचा नैवेद्य दाखवणे अनिवार्य आहे. शक्य असल्यास 'अथर्वशीर्षा'ची 21 आवर्तने करावीत किंवा "ॐ गं गणपतये नमः" या मंत्राचा जप करावा.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
