जालना: आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वेगवेगळ्या प्रथा परंपरा पाहायला मिळतात. नागपंचमी झाल्यानंतर महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये सक्रोबा करण्याची परंपरा वर्षानुवर्षे कायम आहे. मराठवाड्यातील प्रत्येक गावामध्ये नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी माती पासून सक्रोबा केला जातो. सक्रोबा तयार झाल्यानंतर ग्रामीण भागातील महिला सक्रोबा भोवती गोल रिंगण करून पारंपारिक गीते गातात. अतिशय श्रवणीय असलेली ही गीते मोठ्या उत्साहात या महिला गात असतात. अबाल वृद्धांपासून ते लहानगे आणि तरुणी देखील या उत्साहात सहभागी होतात.
advertisement
नागपंचमीनंतर अनोखी परंपरा
नागपंचमी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सक्रोबा तयार करण्याची ही परंपरा आहे. गावातील महिला एकत्र येऊन नदी जवळील वारुळाची माती घेऊन येतात. या मातीत पाणी घालून चिखल तयार केला जातो. या चिखलापासून साचीबद्ध सक्रोबा तयार केला जातो. यानंतर या सक्रोबाला गुंजा फुले, करडई, हरभऱ्याची डाळ अशा विविध वस्तूंनी आकर्षक आणि सुशोभित बनवलं जातं. त्यानंतर सक्रोबाच्या मध्ये दिवा ठेवून व वरती चार काड्या रोवून त्यावर नैवेद्य ठेवले जातात.
श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको! नागाला दूध पाजावं का? सर्पमित्रांनी दिली महत्त्वाची माहिती
गायली जातात पारंपरिक गाणी
सक्रोबा तयार झाल्यानंतर शेतातून काम करून आलेल्या महिला सक्रोबाभोवती जमा होतात. एकमेकीच्या हातात हात घेऊन तालासुरात पारंपारिक गाणी गातात. शेतातील कामाचा शीन हलका होण्यासाठी देखील ही गीते या महिलांना मदत करतात. शेकडो वर्षांपासून मराठवाड्यातील अनेक खेडेगावात ही परंपरा नित्यनेमाने पाळली जाते.
मूलबाळ न झालेल्या महिलांचा नवस
अनेक महिला मूलबाळ होत नसेल तर सक्रोबाला नवस करतात. नवस पूर्ण केल्यानंतर त्या महिलेच्या घरी सक्रोबा केला जातो. तीन वर्ष किंवा पाच वर्षांसाठी हा नवस केला जातो. रात्री 11 ते 12 वाजेपर्यंत पारंपारिक गीते गाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर गावातून सक्रोबाची मिरवणूक काढली जाते. यानंतर गावातील नदीमध्ये विसर्जन केलं जातं. अशाप्रकारे परंपरेचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण देखील अतिशय सहजतेने होतं.
मुस्लिम बांधवांनाही कळली गायीची माया, त्यांनी सुरू केली थेट गोशाळा!
काय सांगतात महिला?
सक्रोबा तयार करण्याची ही परंपरा जन्मोजन्मीची आहे. आपल्या संसारात येणाऱ्या अनेक अडीअडचणी सक्रोबा पुढे मांडण्याचं संधी महिलांना या दिवशी मिळते. मूलबाळ होत नसेल किंवा अन्य काही संसारातील अडीअडचणी महिला पूजा करताना सक्रोबाला सांगतात आणि या गोष्टीचा नवस पूर्ण झाल्यानंतर तीन वर्ष किंवा पाच वर्ष सक्रोबा करण्याचा नवस केला जातो. हा नवस पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेच्या घरी नवसाप्रमाणे सक्रोबा केला जातो, असं सरस्वती काळे यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.