भोपाळ, 13 ऑक्टोबर : आता नवरात्रोत्सवाला अगदीच काही दिवस उरले आहेत. येत्या 15 ऑक्टोबरपासून 23 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव धुमधडाक्यात पार पडेल. तर, 24 तारखेला दरवर्षीप्रमाणे अत्यंत प्रसन्न वातावरणात दसरा साजरा होईल. खरंतर नऊरात्रीत केवळ नऊ रंगांचे कपडे परिधान केले जात नाहीत, तर देवी दुर्गेच्या नऊ रुपांची मनोभावे पूजा केली जाते. हे रंगदेखील देवीलाच समर्पित असतात. सर्वार्थाने नवरात्रीला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. असं म्हणतात की, या दिवसांत देवीकडे मनापासून मागितलेलं मागणं देवी आपल्या पदरात टाकते.
advertisement
मध्यप्रदेशच्या भोपाळचे ज्योतिषी प्राध्यापक भूपेंद्र पांडेय यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गा सप्तशती ग्रंथात असा उल्लेख आहे की, एखाद्या व्यक्तीचं लग्न जुळण्यात अडचणी येत असतील. काही केल्या लग्न जुळत नसेल, तर एक मंत्र म्हणावा. या मंत्रामुळे आपल्या विवाहातील सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्याला अनुकूल असा जोडीदार मिळेल.
Navratri 2023 : 400 वर्षात पहिल्यांदा असा योग, नवरात्रीचे 9 दिवस 9 शुभ मुहूर्त, असा होणार फायदा
शारदीय नवरात्रीत करावा मंत्रजप
विवाहातील अडचणी दूर करण्यासाठी तरुणांनी नवरात्रीत सकाळी आंघोळीनंतर ध्यानसाधना करावी. त्यानंतर ‘पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानु सारिणीम्| तारिणींदुर्गसं सारसागरस्य कुलोद्भवाम्॥’ या मंत्राचा 11 माळजप करावा. याचा अर्थ आहे, 'देवी आई, मला माझ्या मनासारखा/मनासारखी जोडीदार मिळूदे. जो/जी मला संसारात मनासारखी साथ देईल. ज्याचा/जिचा जन्म एका चांगल्या कुटुंबात झालेला असेल.'
दरम्यान, तरुणींनी ज्योतिषांकडे जाऊन या मंत्राचा जप करून घेतला तर उत्तम. आपण स्वतःदेखील हा मंत्र म्हणू शकता. मात्र हा मंत्रजप करताना मनाची एकाग्रता महत्त्वाची. शिवाय 11 माळजप व्हायला हवा. मंत्र अर्धवट सोडून उठणं चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे वेळ, काळ लक्षात घेऊनच मंत्र म्हणावा.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)