मुंबई : चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी म्हणजेच रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा केली जाते. यंदाची रामनवमी 6 एप्रिल 2025 रोजी रविवारी साजरी होणार आहे. पंचांगानुसार या वर्षी रामनवमीची तिथी 5 एप्रिल रोजी शनिवारी संध्याकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी प्रारंभ होईल आणि 6 एप्रिल रोजी रविवारी संध्याकाळी 7 वाजून 22 मिनिटांनी संपेल. या दिवशी श्री रामाची पूजा भक्तीभावाने केली जाते. यंदाच्या रामनवमीसाठी पूजा आणि साधनांची माहिती बोरिवलीतील धार्मिक अभ्यासक प्रभा माने यांनी दिली आहे.
advertisement
रामाची पूजा कशी करावी?
रामनवमीसाठी पूजा करताना आपण श्री रामाच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करावा. यानंतर तूप, दीप, धूप, नैवेद्य दाखवावे. टाईल्स, कमळाचे फुल अर्पण करावे. पूजा करताना ‘श्री राम जय राम जय जय राम’ हा मंत्र म्हणावा.
कुठं हिंदू-मुस्लिम करताय? सोलापूरची ही घटना पाहा, आपल्या ऐक्याचा वाटेल अभिमान!
साधना आणि मंत्र जप
रामरक्षा स्तोत्र आणि श्रीराम मंत्राचा जप करावा. साधना करताना एकाग्रतेने श्रीराम मंत्राचा जप श्री तुळशीच्या आलेवर करावा. यामुळे साधकाच्या मनोबलात वाढ होईल आणि सकारात्मक ऊर्जा शरीरावर आणि मनावर परिणाम करेल.
रामनवमीच्या दिवशी साधना केल्याने व्यक्तिमत्त्वात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. विशेषतः विद्यार्थी आणि नोकरवर्गाने या दिवशी साधना केली पाहिजे. रामरक्षा स्तोत्र आणि श्रीराम मंत्राचा जप केल्याने साधकाच्या जीवनात समृद्धी आणि मानसिक शांती येते, असं माने सांगतात.
विष्णुसहस्त्रनाम पठण
रामनवमीच्या दिवशी विष्णुसहस्त्रनामाचं पठण देखील लाभकारी ठरते. या मंत्राचा जप किंवा पठण केल्याने शरीरावर, मनावर सकारात्मक प्रभाव पडतो आणि एकाग्रतेमध्ये सुधारणा होते. लहान मुलांनी देखील या दिवशी स्तोत्र पठण केल्यास, त्यांचा अभ्यासात विकास होतो आणि एकाग्रता वाढते. रामनवमीच्या दिवशी साधना, पूजा आणि मंत्रजप केल्याने आपल्या जीवनात धार्मिक व मानसिक उन्नती होईल, असंही प्रभा माने सांगतात.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)