बत्तीस शिराळामध्ये जिवंत नागाची पूजा करण्याची प्रथा पुन्हा सुरू केली जाईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत दिले होते. त्यानंतर नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांना शिराळा विधानसभा मतदारसंघातील विविध मागण्यांबाबतचे निवेदन आमदार सत्यजित देशमुख यांनी दिले आहे.
जगातला सर्वात सज्जन साप! कधीच नाही चावत, शेतकऱ्यांचा खास मित्र; पण 'या' गैरसमजांमुळे जातोय बळी!
advertisement
"शिराळा येथील नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, नागपंचमीदिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी" अशी भावना नागप्रेमी ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. लोकभावनेचा आदर करत केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करावी. परंपरेप्रमाणे नागपंचमी साजरी करण्यासाठी परवानगी द्यावी. घटनेने दिलेल्या मूलभूत अधिकारानुसार प्रत्येकाला धर्म, रुढी परंपरा, धार्मिक कार्य पालन करण्याचा अधिकार आहे. त्या माध्यमातून नागपंचमी ही हिंदू धर्म, रुढी, परंपरांप्रमाणे साजरी करून मूलभूत अधिकार जपावेत, असे मत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मांडले आहे. तसेच शासनाच्या सकारात्मक निर्णयाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे शिराळकर ग्रामस्थांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीचा इतिहास
बत्तीस शिराळ्यातील नागपंचमीला शेकडो वर्षांची परंपरा असल्याचे सांगितले जाते. दहाव्या शतकात गोरक्षनाथ महाराज शिराळ्यात आले होते. त्यावेळी पंचमीच्या दिवशी ते एका घरी भिक्षा मागायला गेले. ते घर महाजन नावाच्या व्यक्तीचे होते. भिक्षा जरी मागितली असली तरी बराच वेळ झाला त्यांना भिक्षा मिळाली नाही. नंतर त्या घरातून गृहिणी बाहेर आली आणि तिने महारारांना भिक्षा दिली. भिक्षा द्यायला वेळ का झाला असे गोरक्षनाथांनी त्या गृहिणीला विचारले. त्यावर आपण देव्हाऱ्यातील मातीच्या नागाची पूजा करत असल्याचे त्या गृहिणीने सांगितले. 'तू जिवंत नागाची पूजा करशील का?' असं गोरक्षनाथांनी तिला विचारले. त्यावर त्या गृहिणीने त्यांना 'होय' असे उत्तर दिले. तेव्हापासून पंचमीच्या दिवशी बत्तीस शिराळ्यात नागाची पूजा केली जाते.
बत्तीस शिराळ्यातील महिला नागाला आपला भाऊ मानतात आणि त्याच्यासाठी उपवास करतात. त्या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये यासाठी स्वयंपाकगृहात काही चिरले जात नाही किंवा तळले जात नाही. नागपंचमीच्या निमित्ताने नागाची पूजा करून त्याला वेगवेगळ्या भाज्यांचा निवैद्यही दाखवला जातो.
muharram 2025: मुलासाठी नवस अन् रस्त्यावर वाघ! सोलापुरात मोहरमची 300 वर्षांची अनोखी परंपरा
काय आहे परंपरा?
न्यायालयाने बंदी घालाण्यापूर्वी बत्तीस जिराळ्यात मोठ्या उत्सहाने नागपंचमी साजरी केली जायची. प्रथम गावातील अंबामाता मंदिरात नागाची पूजा केली जाते असे. नंतर प्रत्येकाच्या घरात पूजा केली जायची. या दिवशी नागाच्या प्रतिमेची आणि जिवंत नागांची मिरवणूकही काढली जायची. बत्तीश शिराळ्यातील नागपंचमी पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यातून हजारो लोक उपस्थिती लावत असल्याची माहिती स्थानिक रहिवासी ॲड. सम्राट शिंदे यांनी लोकल18 सोबत बोलताना दिली.
शिराळ्यात साप मारत नाहीत
केवळ नागपंचमीच्या दिवशीच नव्हे तर वर्षभर कधीही शिराळ्यातील लोकांना नाग, साप दिसले तर येथील नागरिक त्याला मारत नाहीत. राहत्या घरी किंवा शेतामध्ये साप आढळल्यास त्याला योग्य पद्धतीने पकडून त्याच्या अधिवासात सोडतात. जखमी साप आढळल्यास त्याच्यावर योग्य ते उपचार करून त्याला डोंगरामध्ये सोडून दिले जाते. परंतु "काही वन्यजीव प्रेमींनी खोट्या अफवा पसरवून शिराळ्यातील कित्येक वर्षांपासून चालत आलेली जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा कायद्याचा धाक दाखवून बंद पाडली आहे. शासनाने खोट्या फवारणा बळी न पडता शिराळकर नागांना कसे हाताळतात आणि कोणतीही इजा न करता पुन्हा अधिवासात कसे सोडून देतात यावर प्रत्यक्ष नजर ठेवावी" अशी अपेक्षा देखील बत्तीस शिराळ्यातील नागप्रेमी ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी करत असलेल्या पाठपुराव्यास शासन दरबारी सकारात्मक भूमिका मिळाली तर नक्कीच आम्ही त्याचे स्वागत करू. आम्ही आमची परंपरा पुन्हा सुरू होण्यासाठी उत्सुक आहोत, अशी प्रतिक्रिया बत्तीस शिराळ्यातील ग्रामस्थांनी दिली.