श्री दत्त महाराजांच्या गिरनार, माहुरगड आणि करवीर या तीन महत्वाच्या ठिकाणांपैकी करवीर हे भिक्षा स्थान आहे. गुरुचरित्रातील एका अध्यायामध्ये असणारा करवीर भिक्षा असा उल्लेख करवीर नगरीशी निगडित आहे. या दत्त मंदिराच्या शेजारीच एकवीरा देवीचे मंदिर आहे. श्री नागनाथ महाराजांनी श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदीरामध्ये श्री दत्त महाराजांच्या भेटीसाठी अन्नछत्र चालू केले. जे सिद्धीचे अन्न घेत नाहीत ते दत्त महाराज असे मानतात. त्यावेळी श्री दत्त महाराजांना एकवीरा देवीने भिक्षा दिली, म्हणून हे भिक्षास्थान मानले जाते. श्री गुरुदेव दत्तांना शोधत नागनाथ महाराज दुपारी 12 वाजता या भिक्षालिंग स्थानावर आले असल्याची माहीती देखील नवनाथ ग्रंथामध्ये पाहायला मिळते, अशी माहिती मंदिराचे पुजारी पुरोहित बाळासो दादर्णे यांनी दिली आहे.
advertisement
Religious: पूजा करताना या 3 गोष्टी घडल्या तर शुभ-लाभ; केलेली उपासना सफल झाल्याचे ते संकेत
गुरू चरित्रात देखील आहे वर्णन
या श्री दत्त भिक्षालिंग मंदिराची महती आपल्याला गुरू चरित्रात देखील पाहायला मिळते. श्री दत्त महाराज करवीरात भिक्षेला येतात असे वर्णन गुरू चरित्रात आहे. या मंदिरात असणारे लिंग हे शिवलिंग नसून यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश अशा दत्ताच्या तीनही गुणांची 3 असलेली लिंग या एकाच पिंडीवर स्थापित झालेली आहेत, असे मंदिर रचना आणि मूर्ती अभ्यासक उमाकांत राणिंगा यांनी सांगितले आहे.
करवीर म्हणजे दत्तगुरुंचे आजोळ
कपिल मुनींचे वास्तव्य राहिलेले कपिलेश्वर हे स्थान म्हणजे करवीरचे ग्रामदैवत होय. कपिल मुनींची माता देवाहुती आणि पिता कर्दमऋषी यांचेही स्थान हे कपिलेश्वर तलाव या ठिकाणी होते. याच कर्दमऋषी आणि देवाहुती यांची कन्या म्हणजे माता अनुसया. तर माता अनुसया यांचे पुत्र म्हणजेच गुरुदेव दत्त होय. या नात्याने पाहायला गेल्यास करवीर नगरी म्हणजे दत्त प्रभूंचे आजोळ आहे. त्यामुळेच श्री दत्त करवीर क्षेत्री दररोज भिक्षा घेण्यासाठी येतात. तसेच नगराच्या बाहेर येऊन एकवीरेच्या मंदिराजवळ थांबून घेतलेली भिक्षा ग्रहण करतात. अशीही या स्थानाची महती असल्याचे देखील उमाकांत राणिंगा यांनी सांगितले आहे.
असा आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर
कोल्हापुरातील रविवार पेठेत आझाद चौक परिसरात कॉमर्स कॉलेज शेजारी हे श्री दत्त भिक्षालिंग मंदिर आहे. मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी 2 मार्ग आहेत. एक मार्ग दत्त मंदिराच्या मागच्या बाजूला आहे, तर दुसरा मंदिर परिसरात असणाऱ्या एकवीरा देवीच्या मंदिरासमोरून आहे. दत्त मंदिराच्या परिसरात श्री गुरुदेव दत्त, श्री श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती असे फोटो लावण्यात आले आहेत.
त्यापुढे मंदिराच्या छताला भेदून गेलेले उंचच उंच उंबराचे झाड पाहायला मिळते. त्याच्या शेजारी महादेवाची पिंड आणि श्री गणेश, नागनाथ यांच्या मूर्ती आहेत. दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात समोर मोठी पिंड आणि त्यावर ब्रम्हा, विष्णू, महेश या तिन्ही गुणांची लिंग आहेत. या पिंडीला आकर्षक अशा पाना-फुलांनी सजविण्यात येते. आत गाभाऱ्यात दत्त पादुका देखील आहेत. तर या पिंडीच्या उजव्या बाजूस श्री दत्तात्रयांची उत्सवमुर्ती आणि डाव्या बाजूला छोटी संगमरवरी श्री गहनीनाथ महाराज यांची मुर्ती आहे.
सध्या या मंदिराचे व्यवस्थापन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती पाहत आहे. दरम्यान दत्तभिक्षालिंग मंदिरात तिन्ही त्रिकाळ आरती होत असते. त्यासोबतच नियमित भजन, पूजन, किर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद देखील मंदीरात होत असतात. मंदिरात दर गुरुवारी पालखी सोहळा पार पडत असतो. तर नारळी पौर्णिमा आणि दत्त जयंतीला मंदिरात विशेष उत्सव सोहळा साजरा केला जातो.
पत्ता :
श्री एकवीरा दत्त भिक्षालिंग मंदिर, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स शेजारी, आझाद चौक, रविवार पेठ, कोल्हापूर - 416002
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)