नाशिक: गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कडाक्याची थंडी असून पारा घसरला आहे. त्यामुळे देवांच्या मूर्तीही उबदार कपड्यांत दिसत आहेत. पंचवटीतील रविवार कारंजा परिसरात नवसाला पावणारा गणपती म्हणून चांदीची मूर्ती असणारा बाप्पा प्रसिद्ध आहे. या मूर्तीला स्वेटर, शॉल परिधान करण्यात आली असून भक्तांप्रमाणे बाप्पांचेही थंडीपासून संरक्षण व्हावे, ही भूमिका असल्याचं पुजाऱ्यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
advertisement
पंचवटीतील रविवार कारंजा परिसरातून गोदावरी नदी वाहते. त्यामुळे या ठिकाणी थंडीचा कडाका जास्त असतो. येथील चांदीचा गणपती प्रसिद्ध असून थंडीच्या दिवसांत पूजा बांधताना बाप्पांना उबदार कपडे परिधान केली जातात. यंदाही दत्त जयंतीनंतर बाप्पा उबदार शॉल पांघरलेल्या रुपात दिसत आहे. तसेच या बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
Yellamma Devi: तब्बल 600 वर्षांनी देवी आली दारी, कोल्हापुरात पहिल्यांदाच असं घडतंय!
90 वर्षांपासूनचे गणेश मंदिर
रविवार कारंजा हा बाजारपेठेचा परिसर असून नेहमीच गजबजलेला असतो. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरुप दिले. त्यात रविवार कारंजा मित्रमंडळानेही सक्रीय भाग घेतला. येथे 90 वर्षांपासून गणपती मंदिर आहे. पण 1978 साली या मंदिरात चांदीची मूर्ती बसविण्यात आली. या ठिकाणी मोठ्या जलोषत बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते. हा बाप्पा भक्तांच्या नवसाला पावत असल्याची भावना भाविकांमध्ये आहे.
बाप्पांना शाल अर्पण
जसे आपल्याला थंडी वाजते तशी आपल्या बाप्पाला देखील वाजतच असणार अशी भाविकांची धारणा आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत बाप्पांना शाल, स्वेटर अर्पण केले जाते. काही दिवसांनी तेच कपडे बाप्पांचा आशीर्वाद म्हणून घरी घेऊन जातात. यंदाच्या थंडीत देखील बाप्पाला रोज शाल, मखमली स्वेटर परिधान करून सायंकाळी सजवले जात असते. बाप्पाचे शाल, स्वेटर मधील सुंदर रूप पाहण्यासाठी रविवार कारंजा पंचवटी भागात नेहमी भाविकांची मोठी गर्दी होते.