सातारा: महाराष्ट्रातील गावोगावच्या मंदिरात होणाऱ्या यात्रांचं एक खास वैशिष्ट्य असतं. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या डोंगर कपारीत बावधन हे गाव आहे. या गावात महाराष्ट्राच नव्हे तर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असणारी बगाड यात्रा भरते. या यात्रेला सुमारे 5 ते 6 लाखांपेक्षा जास्त भाविक सहभागी होत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठं 'बगाड' म्हणून बावधनचं बगाड प्रसिद्ध आहे. पण या बगाड यात्रेची परंपरा कशी सुरू झाली? आणि येथील बागडी कसा निवडला जातो, याबाबत जाणून घेऊ.
advertisement
काय आहे आख्यायिका?
पुरातन काळापासून बगाड यात्रेची प्रथा चालू असल्याचे सांगितले जाते. हजारो वर्षांपूर्वी आई जगदंबेने नरकासुराचा वध केला आणि त्याच्या शिराची (मुंडकं) गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर ही बगाड यात्रा सुरू झाल्याचेही सांगण्यात येते. बावधनची यात्रा म्हणजे देव भैरवनाथ आणि नाथांची पत्नी जोगूबाई यांचा विवाह सोहळा असतो, असे पुजारी सांगतात.
मंदिराचा जिर्णोद्धार करताना आढळली हजारो वर्षांपूर्वीची ऐतिहासिक मातीची भांडी, काय आहे नेमका इतिहास?
भैरवनाथ आणि जोगूबाईचा विवाह सोहळा
भैरवनाथ आणि जोगूबाई यांच्या विवाह सोहळ्यातील महत्वाचा विधी म्हणजे हळद समारंभ होय. नाथांच्या लग्न सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भवानी आई आणि जननी आई या दोन्ही भगिनींना आणले जाते. मंदिरात आल्यानंतर हे दिवटीचं टोक बाहेर काढलं जातं आणि बोंब ठोकून देवाच्या नावानं जयघोष केला जातो. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम सुरू होतो. पंचक्रोशीत बारा बलुतेदार आणि मानाच्या महिला या हळदीच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजेरी लावतात. हळदीच्या कार्यक्रमात देवाला हळद लावून हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतो, असे पुजारी शिवलिंग क्षीरसागर सांगतात. हळदीचा कार्यक्रम पूर्ण झाल्याच्या दिवसापासून या बगाडाच्या यात्रेची सुरुवात होते.
लोहाराला नाल ठोकण्याचा मान
प्रत्येक वर्षी गावातील लोहाराला एक वेगळा मान असतो. त्यांच्या हातून मानाचा नाल या मंदिराला ठोकला जातो. सध्या या मंदिरावर असलेल्या नालांची संख्या सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त असल्याचे देखील सांगण्यात येते. मात्र मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे काम सुरू असल्याने काही प्रमाणावर मंदिरांच्या लाकडांवर असलेल्या नाली बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. शेकडो नाली या ठिकाणी मंदिराच्या सभा मंडपावरील लाकडावर ठोकण्यात आल्या आहेत, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.
27 सदस्यांच्या एकत्र कुटुंबाचा अनोखा आदर्श, एकोपाच ठरतोय प्रगतीचा मूलमंत्र PHOTOS
कसा निवडतात बगाडी?
बावधनचे बगाड वैशिष्ट्यपूर्ण असते. त्याला खिलार जातीचे बैल जुंपले जातात. त्यावर एका व्यक्तीला बागडी म्हणून मान मिळतो. भक्तगण नवसाद्वारे आपली इच्छा देवाजवळ मागत असतात. देवाजवळ मागितलेली इच्छा पूर्ण झाली असेल तर दर वर्षी होळी पौर्णिमेदिवशी रात्री 12 वाजता इच्छा पूर्ण झालेले भक्तगण मंदिरात येऊन त्याचा प्रसाद (कौल) लावला जातो. पाच गहू चिटकवले जातात. या ठिकाणी एक नव्हे तर 70 हून अधिक भक्तगण देवाला कौल लावतात.
कौल लावण्याची पद्धत अनोखी आहे. दोन उजव्या आणि दोन डाव्या अशा पद्धतीने कवल लावला जातो. उजव्या बाजूने कौल मिळाला तर तो बगाड्या मानला जातो. बगाड्या ठरत असताना तो कोणत्या जातीचा आहे हे पाहिलं जात नाही. देव ज्याच्या बाजूने कौल देतील तो बगाड्या असे म्हटले जाते. हे करत असताना या ठिकाणी ग्रामस्थ, पंच, भाविक आणि देवाच्या साक्षीने कौल लावून बगाड्या ठरतो, असेही पुजारी क्षीरसागर यांनी सांगितले.