कोल्हापूर : पहाटेच्या शांततेत मावळतीला निघालेला पौर्णिमेचा चंद्र, अलगद सुटणारा थंड वारा आणि परिसरात रेखाटलेल्या रांगोळ्या दीपोत्सवासाठी सज्ज होत्या. पंचगंगा नदी घाट आणि दीपोत्सव हे अनोखं समीकरण गेली काही वर्ष कोल्हापूरकर अनुभवतायत. नदी घाटावर पहाटे तीन नंतर 51 हजार दिवे प्रज्वलित व्हायला सुरू झाले. पणत्यांच्या उभ्या, आडव्या रेषा एकमेकांत गुंफल्या गेल्या आणि पंचगंगेवर हजारो ज्योतीने घाट उजळून गेला. दीपोत्सवामुळे पंचगंगेला चढलेला हा साज बघण्यासाठी भल्या पहाटे कोल्हापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.
advertisement
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदीघाटावर दीपोत्सवामुळे कोल्हापुरात आज पहाटे लखलख तेजाची न्यारी दुनिया पहायला मिळाली. शिवमुद्रा प्रतिष्ठानमार्फत आयोजित केलेल्या या दीपोत्सवात कोल्हापूरकरांनी लावलेल्या 51 हजार पणत्यांचा लखलखाट आणि सोबत आतषबाजीने पंचगंगा घाट उजळून निघाला. जोडीलाच विविध विषयांवरील आकर्षक रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश आणि भक्तिगीतांचा सुरेल संगम होता. हा दीपोत्सव पाहायला येणाऱ्यांपैकी महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.
राजकारणावर बोलावं तर कोल्हापूरकरांनी! जनतेचं ‘उत्तर’ काय? तुफान फटकेबाजीचा Video
कोल्हापुरातील आजचे हे दृश्य डोळ्यात साठवण्यासाठी हजारो कोल्हापूरकरांनी पंचगंगा नदीघाटावर गर्दी केली होती. विशेष म्हणजे या दीपोत्सवामध्ये कोल्हापूर सह बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांनीही हजेरी लावली होती. आज काढलेल्या रांगोळ्यांमध्ये आणि देखाव्यांमध्ये केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीचा देखावा हा लक्षवेधी होता तसेच रांगोळीच्या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक संदेश देखील देण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून पंचगंगा नदी घाट आणि दीपोत्सव हे अनोखं समीकरण बनलय. आदल्या दिवशी रात्री पाऊस पडल्यानं शुक्रवारी मध्यरात्रीपासून पंचगंगा नदी परिसरात लगबग सुरू होती. कार्यकर्त्यांनी पंचगंगा घाट, मंदिरे, समाधी मंदिरात पणत्या लावल्या होत्या. विविध मंडळाचे कार्यकर्ते,कलाकार, महाविद्यालयीन युवतींच्या जादूई बोटातून रांगोळी साकारली जात होती. पहाटे साडेतीन वाजता पंचगंगा नदी परिसर रांगोळ्यांनी नटला होता. अगदी काहीच वेळात नदी घाट उजळून निघाला. हा सोहळा टिपण्यासाठी कॅमेरे, मोबाइल फ्लॅश होऊ लागले. दीपोत्सव पाहण्यासाठी नदीवर नागरिकांची गर्दी होऊ लागली. नदीतही दिवे सोडले जात होते.