उज्जैन : ज्या भागात आपलं अन्न तयार होतं, त्या स्वयंपाकघराला अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे कधीच आंघोळ न करता स्वयंपाकघरात जाऊ नये असं म्हणतात. शिवाय वास्तूशास्त्रात जेवण बनवण्याबाबतही काही नियम दिलेले आहेत. या नियमांचं पालन न केल्यास आयुष्यात दारिद्र्य येतं असं म्हणतात. सर्वात महत्त्वाचे असतात ते पोळी म्हणजेच चपाती बनवताना पाळायचे नियम.
advertisement
अनेक घरांमध्ये महिला चपात्या मोजून बनवतात. म्हणजे घरात किती सदस्य आहेत, कोण किती चपात्या खाणार, या अंदाजावरून त्या बनवल्या जातात. परंतु असं करणं वास्तूशास्त्रात चुकीचं मानलं गेलंय. ज्योतिषी रवी शुक्ला सांगतात की, चपात्या मोजून बनवल्यास सूर्यदेव नाराज होतात आणि आपल्या घरात दोष निर्माण होतो.
असं म्हणतात की, चपातीचा संबंध हा थेट सूर्याशी असतो. त्यामुळे जर त्या मोजून बनवल्या तर तो सूर्यदेवांचा अपमान मानला जातो. त्यामुळे आपली प्रगती खुंटते, शिवाय आपल्याला वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो ते वेगळंच. तसंच चपाती बनवल्यानंतर उरलेलं कणिक फ्रिजमध्ये ठेवणंही चुकीचं मानलं जातं. या शिळ्या कणिकाच्या चपात्या बनवल्यास आयुष्यात नकारात्मकता येते.
हेही वाचा : चंद्र जेवढा सुंदर, तेवढाच घातक! कुंडलीत असेल कमकुवत तर होऊ शकते दुर्दशा
हिंदू धर्मात गायीला आईचा दर्जा दिला जातो. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो असं म्हणतात. म्हणून शक्य असल्यास घरात बनवलेली पहिली चपाती गायीला द्यावी. यामुळे आपल्याला प्रचंड पुण्य मिळतं. तसंच वास्तूशास्त्रात प्रत्येक कार्यासाठी योग्य अशी दिशा सांगितलेली आहे. त्यानुसार ज्या चुलीवर किंवा गॅसवर आपण चपाती बनवतो, ती कायम आग्नेय दिशेत असायला हवी. शिवाय चपाती बनवताना आपलं तोंड पूर्व दिशेला असायला हवं.
ज्याप्रमाणे पहिली चपाती गायीला चारणं पुण्याचं मानलं जातं, त्याप्रमाणेच शेवटची चपाती ही कायम कुत्र्याला द्यावी. त्यामुळे घरातल्या सर्व अडचणी दूर होऊन हळूहळू घरात सुख, शांती, समृद्धीचं वातावरण नांदतं.
सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.