भाद्रपद महिन्यात 10 दिवस गणपतीचा उत्सव असतो. या उत्सवात कलेच्या, विद्येच्या देवतेची मनोभावे पूजा केली जाते. यंदाही गणपती उत्सवासाठीची तयारी सुरू झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मांडव सजू लागले आहेत. आराशींची तयारी सुरू झाली आहे. घरोघरी स्वच्छतेपासून ते घर सजावटीपर्यंत लगबग सुरू आहे. गणेशोत्सवात गणपतीला आवडणाऱ्या सर्व गोष्टी त्याला अर्पण करण्याचा भाविक मनोभावे प्रयत्न करतात. यात 21 मोदक किंवा लाडू तर असतातच शिवाय बाप्पाला प्रिय असणाऱ्या 21 दुर्वांची जुडी व जास्वंदीचं फूलही त्याला आवर्जून वाहिलं जातं, पण सहसा देवाला वाहिली जाणारी तुळस गणपतीला कधीही वाहिली जात नाही. यामागे एक पौराणिक आख्यायिका आहे.
advertisement
गणपतीला तुळस का वाहत नाहीत?
गणपतीला मोदक, लाडू, दुर्वा, सुपारी, हळकुंड, जानवं अर्पण केलं जातं, पण तुळस कधीही वाहिली जात नाही. खरं तर हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. तिला मातेसमान मानून तिची पूजा केली जाते. प्रत्येक घरात तुळशीवृंदावन असावंच असं समजलं जातं. भगवान विष्णूंना प्रिय असणारी ही तुळस गणपतीसाठी मात्र निषिद्ध समजली जाते. त्यामागे एक कारण आहे.
'दगडूशेठ'च्या जटोली शिवमंदिर सजावटीचे उद्घाटन कधी? विसर्जन मिरवणुकीत 4 वाजता
पौराणिक कथा -
एका पौराणिक कथेनुसार, एकदा गणपती गंगा नदीच्या किनाऱ्यावर तप करत होता. तीर्थयात्रेसाठी निघालेली तुळस त्यावेळी गंगाकिनारी गेली. तिनं ध्यान करत असलेल्या तरुण गजाननाला पाहिलं आणि ती त्याच्या रूपावर मोहीत झाली. गणपतीशी लग्न करण्याची इच्छा तिच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे तिनं गणपतीचं ध्यान भंग केलं. यामुळे संतापलेल्या गजाननानं तिचा प्रस्ताव नाकारला. आपण ब्रह्मचारी असल्याचं त्यानं सांगितलं. ते ऐकून नाराज झालेल्या तुळशीनं गणपतीला त्याची एक नव्हे तर दोन लग्न होतील असा शाप दिला. यावर गणपतीनंही तुळसीला शाप दिला, की तिचं लग्न एका राक्षसाशी होईल. तसंच माझ्या पूजेमध्ये तुळस वाहणं अशुभ समजलं जाईल. यानंतर गणपतीला तुळस वाहणं निषिद्ध समजलं जाऊ लागलं. गजाननाच्या पूजेमध्ये दुर्वा आणि जास्वंदीचं लाल फूल याला विशेष महत्त्व असतं.
खूप काळाचा संघर्ष-कष्ट फळास! सप्टेंबरमध्ये या राशींच्या भाग्योदय, आर्थिक लाभ
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)