काय म्हणाले आदित्य ठाकरे?
रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, पण बीसीसीआयसाठी रक्त आणि महसूल एकत्र वाहत आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. मी केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांना पत्र लिहून बीसीसीआयने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यासाठी संघ पाठवण्याच्या लज्जास्पद कृत्यामध्ये केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
advertisement
पत्रात काय काय लिहिलंय?
पत्रात आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’ या विधानाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमुळे आपल्या देशाला आणि नागरिकांना वेळोवेळी धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय केवळ आर्थिक फायद्यासाठी आणि जाहिरातींच्या महसुलासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत आहे.
बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा मोठं आहे का?
आदित्य ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे की, "बीसीसीआय राष्ट्रीय हितापेक्षा मोठा आहे का? आपल्या जवानांच्या बलिदानापेक्षा तो मोठा आहे का?" त्यांनी पहलगाम येथील हल्ल्याचा उल्लेख करत, त्या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या बलिदानाला बीसीसीआयने दुर्लक्षित केल्याचे म्हटले आहे. दहशतवाद हा असा मुद्दा आहे, ज्यामुळे दोन्ही देशांची शांतता धोक्यात येते, असेही त्यांनी नमूद केले.
पाकिस्तानची दुटप्पी भूमिका
आदित्य ठाकरे यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवरही बोट ठेवले. हॉकी खेळण्यासाठी पाकिस्तानने भारतात येण्यास सुरक्षेच्या कारणास्तव नकार दिला होता, तरीही बीसीसीआय स्वार्थासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. या पत्रातून आदित्य ठाकरे यांनी क्रीडामंत्र्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.