पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने अर्शदीप सिंगवर अश्लिल इशारे केल्याचा आरोप केला आहे. अर्शदीप सिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, या व्हिडिओवरूनच पीसीबीला मिर्च्या झोंबल्या आहेत. याआधी पीसीबीने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचीही तक्रार दाखल केली होती.
पीसीबीचे अर्शदीपवर आरोप
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत-पाकिस्तानमध्ये 21 सप्टेंबरला झालेल्या सुपर-4 मॅचवेळच्या घटनेनंतर पीसीबीने तक्रार केली आहे. अर्शदीप सिंगने प्रेक्षकांकडे पाहून अश्लिल इशारे केल्याचा आरोप पीसीबीने केला आहे. अर्शदीपने अश्लिल इशारे करून आयसीसीच्या आचार संहितेचं उल्लंघन केल्याचा पीसीबीचा दावा आहे. अर्शदीपचं वर्तन बेजबाबदारपणाचं आणि खेळ भावनेला ठेच पोहोचवणारं आहे, त्यामुळे त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीसीबीने केली आहे.
PCB ने केली सूर्याचीही तक्रार
अर्शदीप सिंगच्या आधी पीसीबीने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचीही तक्रार दाखल केली होती. सूर्यकुमार यादवने क्रिकेटमध्ये राजकारण आणल्याचा आरोप करत पीसीबीने आयसीसीकडे तक्रार दाखल केली. आशिया कपमधल्या पहिल्या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने पहलगाम हल्ल्याचा निषेध व्यक्त केला होता, तसंच भारतीय लष्कराचं कौतुकही केलं होतं.