भारतीय खेळाडूंनी आशिया कपच्या सामन्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंसोबत हातमिळवणी केली नाही. मॅच रेफरी पायक्रॉफ्ट फार फार तर पाकिस्तानच्या कर्णधाराला हस्तांदोलन होणार नसल्याचं सांगू शकले असते, ज्यामुळे सार्वजनिकरित्या पाकिस्तानी टीमची अब्रू गेली नसती, पण यामध्ये मॅच रेफरी म्हणून ऍन्डी पायक्रॉफ्ट यांची भूमिका मर्यादित होती, असं आयसीसीचं मत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
हस्तांदोलन वादामध्ये मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांची भूमिका नाही, त्यामुळे एका सदस्याच्या मागणीवरून मॅच रेफरीची उचलबांगडी करणं योग्य नाही, तसंच हे चुकीचे उदाहरण ठरेल, असंही आयसीसीला वाटत आहे. दुसरीकडे पीसीबीने आयसीसीला लिहिलेल्या पत्रात भारतीय खेळाडूंवरही नाराजी व्यक्त केली आहे, पण एमसीसीच्या नियमांनुसार मॅचआधी किंवा मॅचनंतर खेळाडूंनी हस्तांदोलन करणं हा नियम नाही, त्यामुळे पाकिस्तानची मागणी मान्य होणार नसल्याचंही समोर आलं आहे.
advertisement
पाकिस्तान यूएईविरुद्ध खेळणार नाही?
दरम्यान आयसीसीने घेतलेल्या या भूमिकेमुळे पाकिस्तानचं आशिया कपमधील आव्हानही संपुष्टात येऊ शकतं. 17 सप्टेंबरला पाकिस्तानचा सामना युएईविरुद्ध होणार आहे. या सामन्यात ऍन्डी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी असतील, तर आपण मॅच खेळणार नाही, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. आता आयसीसीने मॅच रेफरीबद्दलची मागणी मान्य केली नाही, तर पाकिस्तान युएईविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकणार का? याबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. पाकिस्तानने युएईविरुद्धच्या सामन्यातून माघार घेतली, तर युएई सुपर-4 मध्ये जाईल आणि पाकिस्तानचं आव्हान संपुष्टात येईल. भारताने आधीच सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे.