भारतीय टीमने हस्तांदोलन केलं नाही, त्यामुळे पाकिस्तानच्या कर्णधाराने मॅच संपल्यानंतर झालेल्या प्रेझेन्टेशन सेरेमनीवरही बहिष्कार टाकला होता. यानंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारतीय टीम तसंच मॅच रेफरी ऍन्डी पायक्रॉफ्ट यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मॅच रेफरींनी आयसीसीची आचारसंहिता आणि खेळ भावनेबद्दलचे एमसीसीचे नियम यांचं उल्लंघन केलं आहे. पायक्रॉफ्ट यांनी एका टीमची बाजू घेतली. मॅच रेफ्री म्हणून पायक्रॉफ्ट कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याचे आदेश देऊ शकत नव्हते, असं पीसीबीचं म्हणणं आहे.
advertisement
तर युएईविरुद्ध खेळणार नाही
17 तारखेला पाकिस्तान आणि युएई यांच्यामध्ये आशिया कपचा सामना होणार आहे, या सामन्यातही ऍन्डी पायक्रॉफ्ट मॅच रेफरी आहेत. या सामन्यात पायक्रॉफ्टना हटवलं गेलं नाही, तर आम्ही मॅच खेळणार नाही, अशी धमकी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला दिली आहे. पाकिस्तानच्या या धमकीवर आता आयसीसी कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर?
पाकिस्तानने जर युएईविरुद्धचा सामना खेळला नाही, तर त्यांचं आशिया कपमधील आव्हान लगेचच संपुष्टात येईल. भारताने 2 सामन्यांमध्ये 2 विजय मिळवून आधीच सुपर-4 मधील त्यांचं स्थान निश्चित केलं आहे. तर युएईने ओमानला हरवल्यामुळे त्यांच्या खात्यात 2 पॉईंट्स आहेत. याशिवाय ओमानला हरवल्यामुळे पाकिस्ताननेही 2 पॉईंट्स मिळवले आहेत. पाकिस्तानने शेवटच्या सामन्यात युएईविरुद्ध खेळायला नकार दिला, तर या सामन्याचे दोन्ही पॉईंट्स युएईला मिळतील, त्यामुळे त्यांचे 4 पॉईंट्स होतील आणि पाकिस्तानकडे फक्त 2 पॉईंट्सच राहतील. अशा परिस्थितीमध्ये भारत आणि युएई आशिया कपच्या सुपर-4 मध्ये प्रवेश करतील.