पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक ताणले गेले. भारताने पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळू नये, अशी मागणी या सामन्याआधी मोठ्या प्रमाणावर केली गेली, पण तरीही भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला. या सामन्यानंतर आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याने स्पोर्ट्स तकसोबत बोलताना धक्कादायक दावा केला आहे. बीसीसीआयने स्पर्धेत सहभागी व्हायचा निर्णय घेतला, त्यामुळे खेळाडूंकडे खेळण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता, असं रैना म्हणाला आहे.
advertisement
काय म्हणाला सुरेश रैना?
'मला एक गोष्ट नक्की माहिती आहे. तुम्ही खेळाडूंना वैयक्तिक विचारलंत तर त्यांना आशिया कपमध्ये खेळायचं नव्हतं. त्यांना जबरदस्ती खेळावं लागलं, कारण बीसीसीआयने स्पर्धेत सहभागी व्हायचा निर्णय घेतला. भारत पाकिस्तानविरुद्ध खेळतोय, हे पाहून मलाही वाईट वाटलं. पण तुम्ही सूर्यकुमार यादव आणि त्यांच्या खेळाडूंना वैयक्तिक विचारलंत तर त्यांनीही खेळायला नकार दिला असता. त्यांच्यापैकी कुणालाच खेळायचं नव्हतं', असं वक्तव्य सुरेश रैनाने केलं आहे.
पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले. पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनीही भारत-पाकिस्तान सामन्याला विरोध दर्शवला. सोशल मीडियावरूनही भारत-पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मोहिम चालवली गेली.
भारत-पाकिस्तान पुन्हा खेळणार?
आशिया कपच्या ग्रुप स्टेजमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना झाला, पण सुपर-4 मध्येही या दोन्ही टीम पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. टीम इंडियाने आधीच सुपर-4मध्ये प्रवेश मिळवला आहे, तर पाकिस्तानने युएईचा पराभव केला तर तेदेखील सुपर-4मध्ये प्रवेश करतील, त्यामुळे तिथेही भारत-पाकिस्तान लढत होईल. भारतासोबतच पाकिस्तानही फायनलला पोहोचली तर आशिया कप फायनलमध्येही भारत-पाकिस्तान समोरासमोर येतील.