तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे, पण चर्चा अद्याप सुरूवातीच्या टप्प्यात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बिग बॅश लीगच्या आठ फ्रँचायझींपैकी दोन फ्रँचायझींच्या विक्रीआधी भारतीय बाजारपेठ टार्गेट करण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया हे पाऊल उचलत आहे.
भारतामध्ये सामने खेळवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे दोन वरिष्ठ अधिकारी काहीच दिवसांपूर्वी भारतात आले होते, तसंच त्यांनी चेन्नईमध्ये तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची भेटही घेतली. हेड ऑफ बिजनेस ऑपरेशन फिल रिग्बी आणि हेड ऑफ कॉम्पिटिशन डेव्हलपमेंट ऍन्ड स्ट्रॅटेजीचे प्रमुख मार्गोट हार्ले चेन्नईमध्ये आले होते, असं या वृत्तात म्हटले आहे.
advertisement
दरम्यान पीटीआयने तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यासोबत संपर्क साधला असता त्याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे दोन प्रतिनिधी आले होते, वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला, प्रत्येक मोसमात एक सामना भारतामध्ये खेळण्याचा त्यांचा विचार आहे', असं तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याने सांगितलं.
'क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या दोन प्रतिनिधींनी एमए चिदंबरम स्टेडियमची पाहणी केली, पण चेन्नई हे एकमेव ठिकाण नाही, जे ते पाहत आहेत. पण बीसीसीआयकडून निर्देश मिळाल्याशिवाय आम्ही क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कोणतंही वचन देऊ शकत नाही. या प्रस्तावाला मंजुरी द्यायची का नाही? ते बीसीसीआयला ठरवायचं आहे', असं तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचा पदाधिकारी म्हणाला.
बिग बॅश लीगची टीम असलेली पर्थ स्कॉर्चर्स भारतात खेळण्यासाठी पर्याय असू शकतो, कारण त्यांचा टाईम झोन हा भारतीय टाईम झोनच्या जवळ जाणारा आहे. याशिवाय पर्थ स्कॉर्चर्स टीमचे मालक भारतीय व्यावसायिकांकडून ऑफरसाठी उत्सुक आहेत, असंही या वृत्तामध्ये सांगण्यात आलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबतची ही बोलणी सध्या प्राथमिक टप्प्यात आहेत, कारण ब्रॉडकास्टर्स आणि बीसीसीआयसह वेगवेगळ्या भागधारकांकडून मंजुरी घेणंही आवश्यक आहे. पर्थ स्कॉर्चर्स ही बिग बॅश लीगमधला सगळ्यात यशस्वी टीम आहे. पर्थ स्कॉर्चर्सने सहा वेळा ही स्पर्धा जिंकली आहे.
