बांगलादेशचा संघ 2026 चा आयसीसी टी20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळायला भारतात जाणार नाही, अशी माहिती बांग्लादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.नजरुल यांनी सांगितले की बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) ने बैठकीनंतर हा महत्त्वाचा निर्णय घेतला. आता, आयसीसी या मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक तयार करत असताना, या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (आयसीसी) भूमिका काय आहे ते पाहण्याची आम्हाला वाट पाहावी लागेल.
advertisement
आसिफ नजरुल यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर लिहिले की, "बांगलादेश विश्वचषक स्पर्धेत खेळण्यासाठी भारतात जाणार नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आज (4 जानेवारी) हा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या आक्रमक जातीय धोरणांना प्रतिसाद म्हणून घेतलेल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,असेही ते म्हणाले.तसेच टी20 वर्ल्ड कपमधील बांग्लादेशचे सामने भारताबाहेर करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नेमका वाद काय?
बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानची आयपीएलमधून हकालपट्टी केल्यानंतर बीसीबीने हा निर्णय घेतला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ला मुस्तफिजूर रहमानला संघातून सोडण्याचे निर्देश दिले होते. बीसीसीआयच्या सूचनांचे पालन करून केकेआरने मुस्तफिजूरला सोडले होते.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारने मुस्तफिजूर रहमानला आयपीएल संघातून वगळण्याच्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेतला आहे. बांगलादेशच्या माहिती आणि प्रसारण (आय अँड बी) सल्लागार सय्यदा रिझवाना हसन यांनी संपूर्ण घटना राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे वर्णन केले आहे. आणि यामुळे देशातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत आणि सरकार ते सहजपणे स्वीकारू शकत नाही.
जेव्हा दोन देशांमध्ये राजकीय तणाव असतो तेव्हा सांस्कृतिक देवाणघेवाण आणि क्रीडा संबंध सुधारण्याचे काम करतात. परंतु येथे अगदी उलट घडले आहे. प्रथम बांगलादेशी खेळाडूला संघात निवडण्यात आले आणि नंतर राजकीय कारणांमुळे वगळण्यात आल्याचा आरोप रिझवाना हसन यांनी केला आहे.
दरम्यान गेल्या महिन्यात झालेल्या आयपीएलच्या मिनी-लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने मुस्तफिजूर रहमानला 9.20 कोटींना खरेदी केले. भारतातील काही धार्मिक आणि राजकीय संघटनांनी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या बांगलादेशी खेळाडूवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर बीसीसीआयने हा महत्त्वाचा निर्णय घेतला होता.
