पर्थ स्कॉर्चर्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातल्या मॅचवेळी 16 व्या ओव्हरमध्ये स्टेडियमच्या एका गेट जवळून काळा धूर यायला लागला, हे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांमध्ये घबराट पसरली. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरू लागल्याने मैदानाच्या आत आणि बाहेरील प्रेक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
स्टेडियमच्या गेटजवळ आगीचे धूर येत होते, तरी सामन्यामध्ये कोणताही व्यत्यय आला नाही. पण चाहत्यांचं मॅचवरचं लक्ष मात्र काही काळ हटलं, कारण स्टेडियमबाहेर नेमकं काय झालं आहे? याबाबत चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
advertisement
ऑप्टस स्टेडियमवरील सुरक्षा पथकं आणि स्टेडियम अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून परिस्थिती नियंत्रणामध्ये आणली. समोर आलेल्या वृत्तानुसार स्टँडच्या मागे कचरा किंवा काचेच्या वस्तू जाळल्यामुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
सुदैवाने ही आग किरकोळ होती आणि तात्काळ आटोक्यात आणण्यात आली. आगीमध्ये कोणालाही दुखापत झाल्याचं वृत्त नाही. बिग बॅश लीगने सोशल मीडियावर या आगीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये स्टेडियम कॉम्प्लेक्सच्या बाहेरून धूर येत असल्याचं दिसत आहे.
ऑप्टस स्टेडियम हे ऑस्ट्रेयिलायातील सगळ्यात आधुनिक क्रिकेट स्टेडियमपैकी एक आहे. याआधीही या स्टेडियममध्ये अनेक मोठे क्रिकेट सामने कोणत्याही अडचणींशिवाय आयोजित केले गेले आहेत.
