स्टेडियममधील प्रेक्षकांचा संयम सुटला
न्यूझीलंडने 36 वर्षांचा दुष्काळ संपवत भारतात कसोटी मालिका जिंकल्यानंतर, आता प्रथमच वनडे मालिकाही खिशात घातली आहे. 18 जानेवारी रोजी इंदूरमध्ये झालेल्या अटीतटीच्या सामन्यात किवींनी भारताचा 41 धावांनी पराभव केला. इंदूरच्या होल्कर स्टेडियमवर टीम इंडियाचा हा पहिलाच पराभव ठरला असून, या ऐतिहासिक विजयामुळे ब्लॅक कॅप्सचा आत्मविश्वास उंचावला आहे. या पराभवानंतर स्टेडियममधील प्रेक्षकांचा संयम सुटला आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
पाहा Video
'गंभीर हाय-हाय' अशा घोषणा
या व्हिडिओमध्ये मैदानात उपस्थित असलेले काही चाहते मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. गंभीर यांच्या कामगिरीवर नाराज असलेल्या चाहत्यांनी 'गंभीर हाय-हाय' अशा घोषणा दिल्याने मैदानावरील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. विशेष म्हणजे, ज्यावेळी चाहते गंभीर यांच्या विरोधात ओरडत होते, तेव्हा स्टार फलंदाज विराट कोहली तिथेच उपस्थित होता.
अपमान पाहून विराट प्रचंड अस्वस्थ
दरम्यान, आपल्या प्रशिक्षकाचा असा अपमान होताना पाहून विराट प्रचंड अस्वस्थ आणि संतापलेला दिसला. त्याने संतापाने घोषणाबाजी करणाऱ्या चाहत्यांकडे पाहिले आणि जवळच उभ्या असलेल्या केएल राहुलकडे काहीतरी पुटपुटत डोक्याला हात लावला. गंभीर यांनी मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. गौतम गंभीर यांच्यासाठी प्रशिक्षक म्हणून हा प्रवास अत्यंत खडतर ठरत आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गुवाहाटी येथे झालेल्या पराभवानंतरही त्यांना अशाच रोषाला सामोरे जावे लागले होते. घरच्या मैदानावर सातत्याने होणाऱ्या या पराभवांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता आगामी काळात गंभीर आणि संघ व्यवस्थापन या पराभवातून सावरून कशी पुनरावृत्ती टाळतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
