गौतम गंभीर आणि मनोज तिवारी हे दोघं आयपीएलमध्ये केकेआर आणि टीम इंडियाकडून एकत्र खेळले, पण या दोघांच्या नात्यामध्ये मोठे वाद निर्माण झाले. याबद्दल मनोज तिवारीने माध्यमांसमोर उघडपणे सांगितलं. तसंच गंभीरमुळे आपलं करिअर वेळेआधीच संपल्याचंही मनोज तिवारी म्हणाला.
काय होता गंभीर-तिवारी वाद?
मनोज तिवारी आणि गौतम गंभीर यांच्यातला वाद आयपीएलदरम्यान सुरू झाला. हे दोघं केकेआरकडून खेळायचे आणि गंभीर टीमचा कर्णधार होता. मनोज तिवारीने त्याच्या एका मुलाखतीमध्ये गंभीरसोबतच्या खराब झालेल्या नात्यावर प्रतिक्रिया दिली. केकेआरमध्ये मला जाणूनबुझून टार्गेट केलं गेलं, चांगली कामगिरी केल्यानंतरही गंभीर मला बॅटिंग ऑर्डरमध्ये खालच्या क्रमांकावर पाठवायचा, असा दावा मनोज तिवारीने केला.
advertisement
'इडन गार्डनमध्ये झालेल्या मॅचनंतर गंभीरने पुन्हा कधीच खेळवणार नसल्याची धमकी दिली. हा वाद एवढा वाढला की टीमचा बॉलिंग कोच वसीम अक्रमला मध्ये पडावं लागलं. गंभीरने माझी कॉलरही पकडली', असं मनोज तिवारी म्हणाला. या वादानंतर मनोज तिवारीचं केकेआरसोबतचं करिअर संपलं, कारण टीमने त्याला रिलीज केलं.
रणजी ट्रॉफीमध्येही गंभीर-तिवारीचा वाद
फक्त केकेआरच नाही तर रणजी ट्रॉफीमध्येही गौतम गंभीर आणि मनोज तिवारी यांच्यात वाद झाला होता. 2015 साली दिल्ली आणि बंगाल यांच्यात फिरोजशाह कोटला मैदानात मॅच होती, तेव्हा गौतम गंभीरचा संताप अनावर झाला आणि त्याने आपल्याला शिव्या दिल्या तसंच जीवे मारण्याची धमकीही दिली, असं मनोज तिवारी म्हणाला आहे.
'मी कॅप घालून बॅटिंग करत होतो, पण अचानक फास्ट बॉलर बॉलिंगला आला, तेव्हा मी डगआऊटमधून हेल्मेट मागवलं, यावरून गंभीर नाराज झाला. मी जाणूनबुझून वेळ वाया घालवत आहे, असं त्याला वाटलं. यानंतर स्लिपमध्ये उभ्या असलेल्या गंभीरने माझ्यावर निशाणा साधायला सुरूवात केली. यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाले आणि गंभीरने मला जीवे मारण्याची धमकी दिली. हा वाद वाढल्यानंतर अंपायरना मध्ये पडावं लागलं', असं मनोज तिवारीने सांगितलं.
