नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना आणि शिखर धवन यांच्या एकूण 11.14 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर जप्ती केली. ईडीने केलेल्या चौकशीत दोन्ही माजी क्रिकेटपटूंनी (सूरेश रैना आणि शिखर धवन) विदेशी कंपन्यांसोबत करार करून बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet ला प्रोत्साहन दिले. कर गुन्ह्यांचे उत्पन्न लपविण्यासाठी परदेशी माध्यमांद्वारे पैसे दिले गेले. ईडीने चार पेमेंट गेटवेवर छापे टाकले,4 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम गोठवली आणि 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे मनी लाँड्रिंग उघड केले. या घटनेनंतर हैदराबादचे पोलीस आयुक्त वीसी सज्जनार यांनी दोन्ही खेळाडूंवर थेट आणि कठोर शब्दांत टीका केली असून त्यांच्या आदर्श भूमिकेवर आणि समाजातील प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
advertisement
काय म्हणाले पोलीस आयुक्त?
सज्जनार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, 'क्रिकेटर्स हे लाखो युवकांसाठी प्रेरणास्थान असतात, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कृतीकडे समाज लक्ष देत असतो. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, सट्टेबाजीच्या व्यसनामुळे देशभरात अनेक कुटुंबांची आर्थिक परिस्थिती कोलमडली आहे, अनेक युवक कर्जबाजारी झाले आहेत आणि हजारो लोकांनी या नशेत अडकून आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. अशा परिस्थितीत, समाजात प्रभाव असलेल्या सेलिब्रिटींनी अशा अॅप्सचे प्रमोशन करणे म्हणजे लोकांना थेट चुकीच्या मार्गावर ढकलणे आहे.' या पोस्टवर बऱ्याच कमेंट्स देखील आल्या. पण आता प्रश्न हा आहे की हे कितपत योग्य आहे? सज्जनार यांच्या मताकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, कारण आजकाल ट्रेंडच्या हिशोबाने नवी पिढी पुढे जात आहे.
याआधीही ऑनलाइन बेटिंग नेटवर्क विरोधात अनेक FIR दाखल केल्या गेल्या आहेत
यापूर्वी ईडीच्या चौकशीत समोर आले होते की, 1xBet आणि त्याच्याशी संबंधित ऑनलाइन बेटिंग नेटवर्कविरुद्ध देशभरात अनेक FIR दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये आर्थिक व्यवहार, मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर व्यवहारांचे अनेक पुरावे आढळले. तपासात हेही निष्पन्न झाले की, रैना आणि धवन यांनी या प्लॅटफॉर्म्सशी संबंधित जाहिराती आणि प्रमोशन स्वीकारताना त्यामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक दुष्परिणामांची जाणीव असूनही त्या मोहिमांचा भाग बनण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ईडीने रैनाचे 6.64 कोटीचे म्युच्युअल फंड आणि धवनची सुमारे 4.5 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली.
