17 व्या ओव्हरमध्ये काय घडलं?
मार्क स्टॉयनिस चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. स्टॉयनिस शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिला असता तर त्याने ऑस्ट्रेलियाला सहज विजय मिळवून दिला असता. त्यामुळे त्याला आऊट करण्यासाठी कर्णधार सूर्यकुमार यादवने ऑलराऊंडर वॉश्गिंटन सुंदरच्या हातात बॉल सोपवला. वॉश्गिंटन सुंदरने देखील सूर्याला अजिबात निराश केले नाही. पहिल्या तीन बॉलवर केवळ दोन रन निघाल्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू दडपणात आले. त्यामुळे मोठा फटका मारण्याच्या नादात स्टॉयनिस एलबीडब्ल्यू आऊट झाला. त्यानंतर मोठ्या फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असणारा झेव्हियर बार्टलेट बॅटिंगसाठी मैदानात आला. त्याला पहिला बॉलवरच वॉश्गिंटनने आऊट केले. अगदी सरळ लाईनमध्ये साईड स्क्रीनकडे मारण्याच्या प्रयत्नात झेव्हियरने वॉश्गिंटनकडे कॅच दिला. एकाच ओव्हरमध्ये दोन प्रमुख विकेट गेल्याने भारताने ऑस्ट्रेलियाच्या हातातला विजय खेचून घेतला. सुंदरला बोलिंग देण्याची सूर्याची शक्कल कामी आली.
advertisement
टीम इंडियाची बॅटिंगही फेल
या सामन्यात पहिले बॅटिंग करणाऱ्या टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 167 रन करता आले. शुभमन गिलने सर्वाधिक 46 रन केले, तर अभिषेक शर्माने 28 आणि शिवम दुबेने 22, कर्णधार सूर्यकुमार यादवने 20 रन केले, यानंतर मात्र भारताची बॅटिंग गडगडली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन एलिस आणि ऍडम झम्पाला प्रत्येकी 3-3 विकेट मिळाल्या, याशिवाय झेवियर बार्टलेट आणि मार्कस स्टॉयनिसला एक-एक विकेट मिळाली.
टीम इंडियाची आघाडी
सीरिजचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा तर भारताने तिसरा आणि चौथा सामना जिंकला आहे, त्यामुळे भारतीय टीमने सीरिजमध्ये 2-1 ने आघाडी घेतली आहे. सोबतच टीम इंडिया आता सीरिज गमावणार नाही हेदेखील निश्चित झालं आहे. सीरिजचा पाचवा म्हणजेच शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाणार आहे.
