न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात तिलक वर्माच्या ऐवजी भारतीय टीम मॅनेजमेंट कुणाला संधी देणार? याविषयी चर्चा सुरू होत्या. श्रेयस अय्यर किंवा इशान किशन यांच्यापैकी एक जण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळेल, हे स्पष्ट होतं, पण आता कॅप्टन सूर्यकुमार यादवने या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? यावर थेट उत्तर दिलं आहे.
'इशान किशन तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करेल, कारण तो आमच्या टी-20 वर्ल्ड कप टीमचा भाग आहे आणि त्याची पहिले टीममध्ये निवड झाली होती, त्यामुळे इशान किशनला संधी देणं ही आमची जबाबदारी आहे. तो मागच्या दीड वर्षांपासून टीम इंडियाकडून खेळला नाही, पण स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. इशानची टी-20 वर्ल्ड कपसाठी निवड झाली आहे, त्यामुळे त्याला श्रेयस अय्यरच्या आधी प्राधान्य मिळेल. चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न असता, तर गोष्ट वेगळी असती. दुर्दैवाने तिलक टीममध्ये नाही, त्यामुळे इशान चांगला पर्याय आहे', असं सूर्यकुमार यादव म्हणाला आहे.
advertisement
तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंग करणार इशान
टी-20 वर्ल्ड कपला 7 फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये टी-20 वर्ल्ड कपचे सामने होतील. सूर्यकुमार यादवला तिसऱ्या क्रमांकावर यश आलं आहे, त्यामुळे त्याला याबद्दलही विचारण्यात आलं. याबाबत आम्ही वर्ल्ड कपमध्ये लवचिकता ठेवू, जर संजू आऊट झाला तर मी बॅटिंगला जाईन, अभिषेक आऊट झाला तर तिलक जाईल, असं उत्तर सूर्यकुमार यादवने दिलं.
सूर्याचा खराब फॉर्म
2025 मध्ये सूर्यकुमार यादवला संघर्ष करावा लागला होता. त्याने 113 चा स्ट्राईक रेट आणि 15 पेक्षा कमीच्या सरासरीने रन केले होते. 'मला रन करता आल्या नाहीत, पण मी स्वत:ची ओळख बदलू शकत नाही. मागच्या 3-4 वर्षांमध्ये मी जे केलं आहे, तेच करणार आहे ज्यामुळे मला यश मिळालं. कामगिरी नीट झाली तर ठीक आहे, नाहीतर पुन्हा मेहनत करेन. मी नेटमध्ये तशीच प्रॅक्टिस करत आहे, जशी मी नेहमी करतो', असं वक्तव्य सूर्यकुमार यादवने केलं आहे.
