पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू वसीम अक्रमने भारताला आशिया कप विजेतेपदाचा दावेदार मानलं आहे.तसेच त्याला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल या दोन फलंदाजीची भीती वाटते.वसीम यावेळी पाकिस्तानलाही सल्ला दिला आहे. जर पाकिस्तानला भारताविरुद्ध जिंकायचे असेल, तर त्यांनी त्यांच्या मधल्या फळीवर दबाव आणण्यापूर्वी प्रथम त्यांच्या सलामी जोडीला बाद करावे,असा प्लान त्याने सांगितला आहे.
advertisement
सुपर फोर टप्प्यात कमी धावसंख्या असूनही बांगलादेशला हरवणारा सलमान आगाचा संघ त्यांचा आत्मविश्वास आणि गती कायम ठेवेल अशी आशा त्याने व्यक्त केली.पाकिस्तानने गुरुवारी बांगलादेशविरुद्ध १३६ धावांचे माफक लक्ष्य यशस्वीरित्या राखले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना भारताशी होईल.
वसीम अक्रमने माध्यमांना सांगितले की, "हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आहे आणि मला आशा आहे की रविवारीही पाकिस्तानची गोलंदाजी प्रभावी असेल. भारत या सामन्यातही निश्चितच विजयाचा दावेदार आहे.पणतुम्ही पाहिले आहे, क्रिकेट चाहत्यांनी पाहिले आहे, मी पाहिले आहे की या स्वरूपात काहीही घडू शकते. एक चांगली खेळी, एक चांगला स्पेल सामन्याचा मार्ग बदलू शकतो.
अक्रम पुढे म्हणाला, पाकिस्तानने रविवारीही हा आत्मविश्वास, हा वेग कायम ठेवावा आणि स्वतःला आधार देत हुशारीने खेळावे. जर पाकिस्तान सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये अभिषेक शर्मा आणि शुभमन गिल यांचे बळी घेण्यात यशस्वी झाला तर ते भारताच्या मधल्या फळीवर दबाव आणू शकतात. २१ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात गिल आणि अभिषेक यांनी १०५ धावांची भागीदारी केली होती.
वासिम अक्रम म्हणाला, "सुरुवातीला काही बळी, विशेषतः अभिषेक आणि गिल यांच्या बळींमुळे भारतावर निश्चितच दबाव येऊ शकतो. ही एक निकराची लढत असावी आणि मला आशा आहे की सर्वोत्तम संघ शेवटी जिंकेल.' आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे.