शिवांग कुमार याला सनरायजर्स हैदराबादने आयपीएल लिलावामध्ये 30 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं. शिवांग कुमार हा मूळचा मध्य प्रदेशचा आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याला फार अनुभव नाही. शिवांगने आतापर्यंत फक्त चार टी-20 आणि 3 लिस्ट ए (विजय हजारे ट्रॉफी) च्या मॅच खेळल्या आहेत. फक्त 7 मॅचचा अनुभव असलेल्या शिवांग कुमारने आयपीएल सारख्या जगातल्या सगळ्यात मोठ्या टी-20 लीगमध्ये पदार्पण केलं आहे.
advertisement
विजय हजारे ट्रॉफीमध्ये शिवांगने कर्नाटकसारख्या मजबूत टीमविरुद्ध 45 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. तर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने बिहारविरुद्ध 25 रनवर 3 विकेट मिळवल्या. विजय हजारे ट्रॉफीमध्ये झारखंडविरुद्ध शिवांगने 69 बॉलमध्ये 67 रनची झुंजार खेळी केली. या ऑलराऊंड कामगिरीमुळे शिवांगला आयपीएल पदार्पणाची संधी मिळाली.
पहिल्याच सामन्यात शिवांग नाराज
मॅचची 9 वी आणि स्वत:ची दुसरी ओव्हर टाकायला आलेल्या शिवांग कुमारच्या बॉलिंगवर सनरायजर्स हैदराबादच्या फिल्डरनी तीन वेळा मिस फिल्डिंग केली. यातल्या दोन मिस फिल्डिंगवर दोन फोर आणि एका मिस फिल्डिंगवर 3 अशा एकूण 11 रन आल्या. हर्ष दुबे आणि रिंकू सिंग यांच्या मिस फिल्डिंगवर दोन फोर गेल्या तर पेनच्या मिस फिल्डिंगवर केकेआरला 3 रन मिळाल्या. हैदराबादच्या फिल्डरनी केलेल्या या खराब कामगिरीनंतर शिवांग नाराज झाला, त्यानंतर अभिषेक शर्मा हा स्वत: शिवांगजवळ गेला आणि त्याने शिवांगला शांत राहण्याचा आणि स्वत:चं लक्ष विचलित न करण्याचा सल्ला दिला. शिवांग कुमारने त्याच्या 4 ओव्हरमध्ये 41 रन दिल्या, पण त्याला एकही विकेट घेण्यात यश आलं नाही.
अभिषेकच्या कृतीचं कौतुक
पदार्पण करणाऱ्या शिवांगचा आत्मविश्वास ढळू नये यासाठी अभिषेक शर्माने स्वत: पुढाकार घेतला. अभिषेक शर्माच्या या कृतीचं कौतुक होत आहे. अभिषेक शर्मा हा हैदराबादच्या टीमचा उपकर्णधार आहे. पॅट कमिन्स दुखापतीमुळे खेळू शकत नसल्यामुळे हैदराबादने इशान किशनला कर्णधार आणि अभिषेक शर्माला उपकर्णधार केलं आहे.
