गुजरात टायटन्सने दिलेलं 163 रनचं आव्हान पार करण्यासाठी पंजाब बॅटिंगला उतरली होती. तेव्हा 12व्या ओव्हरमध्ये राशिद खानच्या बॉलिंगवर कूपर कॉनलीने खणखणीत शॉट मारला, हा बॉल इतक्या वेगाने आला की श्रेयस अय्यरला हलायलाही संधी मिळाली नाही आणि बॉल थेट त्याच्या मनगटावर जाऊन आदळला. शॉट लागल्यानंतर अय्यर विव्हळला आणि थेट मैदानातच बसला. श्रेयस अय्यरला विव्हळताना पाहून पंजाबच्या टीमची धाकधूक वाढली.
advertisement
श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर अपडेट
श्रेयस अय्यरच्या दुखापतीवर पंजाब किंग्सचा सहाय्यक कोच ब्रॅड हॅडिनने मोठी अपडेट दिली आहे. श्रेयस अय्यरला सुदैवाने फ्रॅक्चर झालेलं नाही पण त्याच्या हातावर सूज आहे. शुक्रवारी चेन्नईविरुद्ध होणाऱ्या सामन्यासाठी श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता आहे, असं ब्रॅड हॅडिन म्हणाला आहे.
श्रेयस अय्यर काय म्हणाला?
गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर स्वत: श्रेयस अय्यरने त्याच्या दुखापतीवर प्रतिक्रिया दिली होती. 'सर्व काही ठीक आहे, पूर्वीसारखंच आहे, सध्या तरी मी एवढंच सांगू शकतो. मला फक्त सकारात्मक राहायचं आहे. आशा आहे की सर्व काही ठीक होईल', असं वक्तव्य श्रेयस अय्यरने गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर केलं होतं.
पंजाबची विजयी सुरूवात
आयपीएलच्या या मोसमात पंजाब किंग्सने विजयी सुरूवात केली आहे. गुजरातविरुद्धच्या सामन्यात पंजाबचा 3 विकेटने विजय झाला. गुजरातने दिलेलं 163 रनचं आव्हान पंजाबने 19.1 ओव्हरमध्ये पार केलं. पंजाबचा दुसरा सामना शुक्रवारी चेन्नई सुपरकिंग्सविरुद्ध होणार आहे. चेन्नईचा मात्र राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे, त्यामुळे मोसमातला पहिला विजय मिळवण्यासाठी सीएसके मैदानात उतरेल. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर हा सामना होणार आहे. एमएस धोनीशिवाय चेन्नईची टीम मैदानात उतरणार आहे, कारण धोनीही दुखापतीमुळे पहिल्या दोन आठवड्यांसाठी स्पर्धेतून बाहेर झाला आहे.
