आशिया कपसाठी बुमराह उपलब्ध
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुढील महिन्यात होणाऱ्या आशिया कपसाठी स्वतःला उपलब्ध करून दिलं आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, बुमराहने काही दिवसांपूर्वी निवडकर्त्यांशी चर्चा केली होती आणि त्यांना या स्पर्धेत खेळण्याबाबत माहिती दिली होती. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमराहने इंग्लंड दौऱ्यावर पाचपैकी फक्त तीन कसोटी सामने खेळवण्यात आले होते. त्यामुळे तो आशिया कप खेळेल, अशी शक्यता होती.
advertisement
बुमराहने गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतासाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता जिथे भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला होता. त्या सामन्यात बुमराहने 18 धावा देऊन 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर आता बुमराह आशिया कपमध्ये खेळताना दिसू शकतो.
कसा असेल आशिया कप?
दरम्यान, भारतीय संघ आशिया कपसाठी लवकरच यूएईला पोहोचेल. संघातील बहुतेक खेळाडू कोणत्याही सामन्याच्या सरावाशिवाय आशिया कपमध्ये जातील. या स्पर्धेत एकूण 8 संघ भाग घेणार आहेत, ज्यात भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग, ओमान आणि यूएई यांचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांविरुद्ध 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये खेळणार आहेत. जर दोन्ही संघ सुपर ४ स्टेजमध्ये पोहोचले, तर ते पुन्हा एकदा एकमेकांविरुद्ध खेळू शकतात.